मुंबई (Mumbai) : जमीन मोजणीची प्रकरणे वेगाने आणि अचूक होण्यासाठी रायगड जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडून जिल्ह्यासाठी ६ जमीन मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारकडून ४० कोटींचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे.
उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंगलहरीद्वारे (सिग्नल) रोव्हर मशीनच्या माध्यमातून मिळणारे अक्षांश आणि रेखांश हे कायमस्वरूपी जतन होणार आहेत. या पद्धतीने होणाऱ्या मोजणीमुळे बांध खोदून जमीन बळकावण्याचे प्रकार कायमचे थांबणार असून, नैसर्गिक आपत्तीमुळे मोजणीच्या खुणा गेल्या, तरी अक्षांश आणि रेखांशांच्या साह्याने पूर्वीच्या खुणा मिळू शकणार आहेत.
यापूर्वी प्लेन टेबलने जमीन मोजणी करण्यात येत होती. त्यामुळे जमीन मोजणीसाठी विलंब लागायचा. सध्या इलेक्ट्रॉनिक टोटल मशीन (ईटीएस) यंत्रांच्या साह्याने मोजणी केली जाते. मागील वर्षी जिल्हा नियोजनमधून १३ टोटल मशीन मागवण्यात आल्या असून, रायगड जिल्ह्यात सध्या चालू स्थितीत १८ टोटल मशीन कार्यरत आहेत. मात्र, या पद्धतीने होणाऱ्या मोजणीतील अचूकतेबाबत साशंकता निर्माण होते. रोव्हर मशीनमुळे जमीन मोजणी ही उपग्रहाच्या साह्याने केली जाणार असल्याने ही मोजणी अचूक असणार आहे. रोव्हर मशीनसाठी राज्य सरकारकडून सुमारे ४० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. मोजणी करण्यासाठी ७७ मोजणी स्थानके म्हणजे कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन (कॉर्स) उभारण्यात येणार आहेत.
कोकणातील शेतकऱ्यांची जमीनधारणा कमी असली तरी शेताच्या बांधावरून होणारे वाद, कोर्टकचेऱ्या अधिक आहेत. रायगड जिल्ह्यातील जमिनीचे दर वाढल्याने सध्या बांधाबांधांवरून भाऊबंदकी सुरू आहे. काही ठिकाणी बांध खोदून जमीन बळकावण्याचे प्रकार घडतात. मात्र, रोव्हर मशीनद्वारे जमिनीचे अक्षांश आणि रेखांश हे निश्चित होत असल्याने बांध खोदून दुसऱ्याच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले असल्यास ते समजू शकणार आहे. भूकंप, पूर किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तींमुळे जमिनीच्या खुणा गेल्या, तरीही हद्द निश्चित करण्यासाठी अडचण येणार नाही.
‘रोव्हर मशीनद्वारे अक्षांश-रेखांशांच्या मदतीने आपल्या जमिनीचे लोकेशन निश्चित होणार आहे. भूमि अभिलेखमध्ये अधिक अचूकता यावी यासाठी प्रयत्न असून, टोटल मशीनचाही वापर प्रभावीपणे होत आहे. अशा आधुनिक यंत्रांद्वारे जमिनीचे विवाद कमी होतील अशी आशा आहे, अशी माहिती रायगड जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळे यांनी दिली.