मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी रेल्वे खात्याने ८०० कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. येत्या ३१ मे पर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असा अंदाज आहे.
मुंबई-ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ मध्ये पहिल्यांदा रेल्वे गाडी धावली होती. त्यामुळे ठाणे स्थानकालाही ऐतिहासिक दर्जा आहे या रेल्वे स्टेशनचा विमानतळाच्या धर्तीवर पुर्नविकास झाल्यास प्रवाशांचा प्रवास सुकर होईल. ठाणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी ठाणे शहर भाजपच्यावतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची गेल्या वर्षी ८ डिसेंबर २०२१ रोजी भेट घेतली होती.
राज्यसभेचे तत्कालीन सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळात आमदार निरंजन डावखरे, महापालिकेतील तत्कालीन गटनेते मनोहर डुंबरे, सुजय पत्की यांचाही सहभाग होता. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी ८०० कोटी रुपयांचे टेंडर जारी केले आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत टेंडर प्रक्रिया खुली होत असून ३१ मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काही महिन्यातच ठाणेकरांना अद्ययावत स्थानक उपलब्ध होईल.
ठाणे शहराच्या विकासासाठी भाजपा कटीबद्ध असून, ठाणे रेल्वे स्थानकाप्रमाणे नवीन ठाणे स्टेशनच्या कामासाठी पाठपुरावा केला जात आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले. यापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून ठाणे शहराला कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध झाला असल्याचेही डावखरे यांनी नमूद केले. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाचे आमदार व ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांनी आभार मानले आहेत.