कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे टेंडर लवकरच; ८५७ कोटींचे बजेट

Railway
RailwayTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : अनेक वर्षांपासून रखडलेल्‍या महत्त्‍वपूर्ण कल्याण-मुरबाड (Kalyan-Murbad) रेल्वेच्या प्रत्यक्ष कामाला सप्टेंबरअखेर सुरुवात होईल, अशी चिन्हे आहेत. या प्रकल्पाचे टेंडर मंजूर करण्याची प्रक्रिया वेगाने करण्याचे निर्देश केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिले आहेत. या रेल्वे मार्गाला सुमारे ८५७ कोटींचा खर्च येणार आहे.

Railway
पुणे महापालिकेचा सुपर निर्णय; आता ठेकेदारांना एका खड्ड्याला ५ हजार

राज्यात सत्तापालट होताच, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुरबाड रेल्वेमार्गाच्या रखडलेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. या मार्गासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के वाटा उचलण्याची हमी महाविकास आघाडीकडून दिली गेली नसल्याचे निदर्शनास आणले. त्यानंतर राज्य सरकारने युद्धपातळीवर हालचाली करून दुसऱ्या दिवशीच रेल्वे मंत्रालयाला महाराष्ट्र सरकारकडून ५० टक्के खर्चाची हमी घेतली जाणार असल्याचे पत्र पाठविले. त्यामुळे नव्या भाजप-शिवसेनेच्या राजवटीत कल्याण-मुरबाड रेल्वेला गती येणार असल्याचे स्पष्ट झाले.

Railway
मुंबई-गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दाणादाण; कुठे भेगा, कुठे...

या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीतील रेल भवन येथे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भेट घेतली. रेल्वे प्रकल्पांच्या मान्यतेसाठी तांत्रिक मुद्यांबरोबरच विविध मान्यतांमुळे जादा कालावधी लागण्याची शक्यता असते. मात्र, कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्प हा एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीचा असल्याने त्याला मान्यता देण्याचा अधिकार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आहे. ते या प्रकल्पासाठी अनुकूल असल्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे मार्ग लवकर मार्गी लागणार असल्याची अपेक्षा आहे. सध्याच्या रेल्वेच्या नियमावलीनुसार, कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाचे कार्यकारी संचालक समितीद्वारे मूल्यमापन होईल. त्यानंतर वित्तीय समितीच्या सदस्यांद्वारे तत्त्वतः मान्यता दिली जाईल

Railway
सत्ताबदलाचा पुणे-नाशिक सेमी बुलेट ट्रेनला मोठा बूस्टर; भूसंपादन...

मुरबाड रेल्वे प्रकल्पाची निश्चित केलेली ८५७ कोटींची किंमत व त्याची व्यवहार्यता तपासून तो मंजुरीसाठी नीती आयोग व अर्थ मंत्रालयाकडे पाठविला जाईल. त्याला नीती आयोगाचे मूल्यांकन मिळाल्यानंतर २१ दिवसांत रेल्वेच्या विस्तारित बोर्डाच्या बैठकीत मान्यता दिली जाणार आहे. या प्रकल्पाला रेल्वे बोर्डात अंतिम मंजुरी दिली जाऊन, त्याच्या प्रती नीती आयोग, अर्थ मंत्रालय आणि सांख्यिकी विभागासह सर्व सदस्यांना वितरित केल्या जातील. विशेष म्हणजे एखाद्या प्रकल्पाची किंमत एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याला रेल्वेमंत्री मंजुरी देऊ शकतात. त्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाचे काम सप्टेंबरअखेरपर्यंत प्रत्यक्षात सुरू होईल, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना दिली आहे.

असा असणार मार्ग...
कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गावरील नियोजित स्थानके
कल्याण
शहाड
आंबिवली
कांबा रोड
आपटी
मामनोली
पोटगाव
मुरबाड

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com