मुंबई (Mumbai) : मुंबई-नायगाव-जूचंद्र असा नवा बायपास बांधून बोरिवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांदिवली येथे कोकणवासीयांच्या मेळाव्यात दिली. याच वेळी हार्बर मार्ग बोरिवलीला जोडण्याच्या आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याचे वैष्णव यांनी स्पष्ट केले.
उत्तर मुंबईतील लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांनी या मेळाव्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे बोरिवली स्थानक कोकण रेल्वेला जोडण्यात यावे, गोरेगावपर्यंतचा हार्बर रेल्वेमार्ग बोरिवलीला जोडण्यात यावा; तसेच वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्यात यावी, अशा तीन मागण्या केल्या. त्यावर पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानुसार, या तिन्ही कामांना मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत आणण्यासाठी ८२६ कोटी रुपयांची, तर नायगाव-जूचंद्र बायपाससाठी १७६ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली. तसेच मुंबईकरांसाठी वर्ल्ड क्लास लोकल वंदे मेट्रो तयार आहे. या गाडीमुळे मुंबईकरांची लाईफलाईन पूर्णपणे बदलणार आहे, असे स्वप्न त्यांनी दाखवले.
हार्बर रेल्वेचा बोरीवलीपर्यंत विस्तार याबरोबर दहिसर आणि कांदिवली ही उत्तर मुंबईतील दोन रेल्वे स्टेशन स्मार्ट बनविण्यासाठी वैष्णव यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी यावेळी पीयूष गोयल यांनी केली. त्याला प्रतिसाद देताना हार्बरच्या विस्तारासाठी मोदी सरकारने ८२६ कोटी मंजूर केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. कोकणपर्यंत रेल्वे नेण्यात वसई येथे बायपासचा अडथळा आहे. तो दूर करण्यासाठी १७६ कोटी मंजूर केल्याचे वैष्णव म्हणाले. हार्बर सेवा बोरिवलीपर्यंत आणणे, ही आताच्या घडीला येथील ज्वलंत मागणी आहे. रेल्वे मेट्रोला जोडली तर खूप फरक पडेल. बोरिवली, मालाड ही दोन स्टेशन स्मार्ट होत आहेत. पुढच्या टप्प्यात दहिसर आणि कांदिवलीला स्मार्ट स्टेशन बनविण्यात यावे, अशी मागणी पीयूष गोयल यांनी यावेळी केली.