Mumbai News मुंबई : गौण खनिज उत्खनन व वाहतुकीबबात ‘सिस्टिम इंटेग्रेटर’ म्हणून मे. शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रा. लि कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कंपनीकडून गौण खनिज वाहतुकीचे दुय्यम बनावट वाहतूक पासेस प्रकरणी तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाचे त्रयस्थ पद्धतीने तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनीविरुद्ध शासन स्तरावरून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
यासंदर्भात सदस्य जयकुमार गोरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यातील वाळू व इतर गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूक संबंधी प्रक्रियेचे संगणकीकृत नियंत्रणाच्या अनुषंगाने टेंडर प्रक्रियेतून मे. शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रा. लि. कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीने महाखनिज संगणक प्रणाली विकसित केली आहे.
या कंपनीला शासनाने दिलेले टेंडर रद्द करण्यात आले आहे. त्याविरूद्ध कंपनी न्यायालयात गेली आहे. कंपनीने आतापर्यंत केलेल्या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीअंती कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची व दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. टेंडर रद्द झाल्यामुळे गौण खनिजबाबतची माहिती शासनाला देणे कंपनीला बंधनकारक आहे.
ही संपूर्ण माहिती घेण्यात येईल. आवश्यकता पडल्यास या प्रकरणात दोषी असलेल्यांविरूद्ध फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येतील, असेही महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.