मात्र, या पुनर्विकास प्रकल्पास विलंब होत असल्याने आता हे 'गेस्ट हाऊस' स्वतंत्रपणे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्याच्या 'पीडब्ल्यूडी' विभागाने नुकतेच त्यासाठीचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. याठिकाणी तब्बल ५०० खोल्यांचे भव्य 'गेस्ट हाऊस' दोन वर्षांत उभे केले जाणार आहे.
या 'गेस्ट हाऊस'साठी २२ ऑगस्ट २०१९ रोजी १६२ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य सरकारने मान्यता दिली होती. मधल्या काळात कोरोनामुळे कोणतेही नवीन बांधकाम हाती घेऊ नये आणि कोणतीही तांत्रिक मान्यतादेखील देऊ नये असा शासन निर्णय काढण्यात आला होता. त्यामुळे या विश्रामगृहासाठी खासगी वास्तुविशारद सल्लागाराची नेमणूक करून प्रकल्पाचे हाती घेणे शक्य झाले नव्हते.
तब्बल ४८ हजार चौरस फूट जागेवर हे १२ मजल्यांचे आणि ५०० खोल्यांचे भव्य 'गेस्ट हाऊस' उभारण्यात येणार आहे. त्यावर १४३ कोटी रुपये खर्च होणार आहेत. वांद्रे येथे आधीपासूनच असलेल्या शासकीय संक्रमणगृहाच्या जागेवर हे 'गेस्ट हाऊस' आकारास येईल. याठिकाणी तीन भूमिगत मजले, एक तळमजला, एक व्यावसायिक मजला आणि वर ११ मजले बांधण्यात येणार आहेत. या ११ मजल्यांमध्ये २८६ अतिथी कक्ष, १० अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीचे कक्ष आणि इतर २९६ कक्ष असतील.
आठ लिफ्ट आणि दोन फायर लिफ्ट असतील. याशिवाय, रेस्टॉरन्ट, कँटिन, कॉन्फरन्स रूम असेल. प्रकल्पास तांत्रिक मान्यता आधीच देण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन कंपनीची नियुक्ती करण्याचे 'पीडब्ल्यूडी'चे नियोजन आहे.