नवी दिल्ली (New Delhi) : पुणे-चाकण-शिंगणापूर परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा बीओटी तत्त्वावर हरित द्रुतगती मार्ग लवकरच होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
या संदर्भात शिवसेनेचे श्रीरंग आप्पा बारणे यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले, पुणे-चाकण या औद्योगिक परिसरात वाहतुकीची घनता अधिक आहे. यामुळे चाकण-तळेगाव ते शिंगणापूर पर्यंत एक उन्नत (एलिवेटेड) मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत हरित द्रुतगती महामार्ग बीओटी तत्त्वावर बांधला जाणार आहे. या मार्गामुळे या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई मेट्रोचा तिसरा टप्पा लवकरच
मुंबई मेट्रोचा तिसऱ्या टप्प्याचे काम पुढील महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली. या संदर्भात शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी प्रश्न विचारला होता. सध्या देशात ९०६ किलोमीटर लांबीपर्यंत मेट्रोचा विस्तार झाला आहे. हा विस्तार आणखी ९६० किलोमीटरपर्यंत करावयाचा आहे. येत्या तीन वर्षात हे लक्ष्य पूर्ण केले जाणार आहे. मुंबईच्या मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पुढील महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बिल्डींग प्लान ऑनलाइन
मुंबईत महापालिकेत ऑनलाइन पद्धतीने इमारत बांधकामाचे नकाशे मंजूर करण्याची यंत्रणा सुरू करण्यासाठी राज्य सरकारला सूचना देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली. या संदर्भात भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी प्रश्न विचारला होता.