Pune Ring Road News मुंबई : पुणे रिंग रोड पूर्व प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ५ हजार ५०० कोटी हुडकोकडून कर्जरुपाने घेण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मागणी केल्यानुसार या कर्जासाठी शासन हमी देण्यात येईल. एकूण ९७२.०७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावयाचे असून ५३५.४२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी १ हजार ८७६ कोटी २९ लाख रुपये निधी देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पुणे व पिंपरीची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी १३६ किमीचा रस्ता बांधण्यात येणार आहे. पुणे रिंगरोड हा एमएसआरडीसीद्वारे ४ ते ६ लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग म्हणून विकसित केला जाईल. त्याचे बांधकाम खेड, हवेली, पुरंदर, भोर, मुळशी आणि मावळ या तालुक्यांमधून ९ पॅकेजेस अंतर्गत केले जाईल.
प्रकल्प या गावांतून जाणार -
भोर - केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव, रांजे
हवेली - रहाटवडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव मावळ, वरदाडे, मालखेड, सांडवी बुद्रूक, सांगरुण, बहुली
मुळशी - कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरवडे, कासार आंबोली, भरे, अंबडवेट, घोटावडे, रिंहे, केससेवाडी, पिंपलोळी
मावळ - पाचर्णे, बेंबडओहोळे, धामणे, परंदवाडी, उर्से
कसा असेल रिंगरोड -
बोगदे : आठ
छोटे पूल : तीन
मोठे पूल : दोन
एकूण लांबी : १३६ किलोमीटर
एकूण रुंदी : ११० मीटर
पूर्व रिंगरोड : ७१.३५ किमी
पश्चिम रिंगरोड : ६५.४५ किमी