मुंबई (Mumbai) : ‘‘महाराष्ट्र हा गौरवशाली इतिहासाचा समृद्ध प्रांत असून येथे आगामी भविष्याची चुणूक दिसते. हे राज्य जगातील सर्वांत मोठे आर्थिक पॉवर हाउस होईल. रिझर्व्ह बँकेने सादर केलेल्या अहवालानुसार मागील तीन ते चार वर्षांमध्ये आठ कोटी नवे रोजगार निर्माण झाले असून जी मंडळी खोटा प्रचार करत होती त्यांची तोंडे यामुळे गप्प झाली आहत’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी व्यक्त केला. गोरेगाव येथील ‘नेस्को सेंटर’ मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ‘मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने’चाही शुभारंभ करण्यात आला. मुंबईतील ठाणे-बोरिवली लिंकसह तीन प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांनी केले.
ते म्हणाले, ‘‘ तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर जगातील गुंतवणूकदारांनी भारतावर विश्वास ठेवत या राजवटीचे उत्साहात स्वागत केले आहे. तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट उत्साहाने आणि तिप्पट वेगाने काम करण्याची घोषणा आम्ही आधीच केली आहे. देशाला बदलण्याचे काम माझे सरकार करत आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून पूर्वीच्या प्रकल्पांना नावे ठेवली जात होती त्या प्रकल्पांची उपयुक्तता आता लक्षात आली आहे. ‘अटल सेतू’ आज दिमाखाने उभा असताना या प्रकल्पातही अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र आज या प्रकल्पामुळे किती फायदा होतो? हे जगाच्या लक्षात येत असून या मार्गावरून दररोज तीस हजार गाड्या धावत आहेत. मुंबई पनवेल वाहतुकीचा वेळ ४५ मिनिटांनी कमी झाला आहे. मुंबईत दहा वर्षांपूर्वी केवळ आठ किलोमीटर मेट्रो लाइनचे जाळे होते मात्र आता ८० किलोमीटरचे मार्ग सुरू झाले असून २०० किलोमीटरच्या मार्गांचे बांधकाम सुरू आहे.’’ या कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागतपर प्रास्ताविकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबईत कोठून कुठेही एका तासाच्या आत जाण्याची क्षमता असणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न आम्ही पाहिले होते ते प्रत्यक्षात येत असून त्याचा आम्हाला आनंदच होतो,’ असे नमूद केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास घेतल्याचे सांगितले.
पालखी मार्ग उभारणीला वेग
महाराष्ट्राचा कायापालट करणारे प्रकल्प यावेळी मोदींनी तपशीलवार सांगितले. ‘‘ नागपूर, अजनी, कुर्ला रेल्वे स्थानकांचा विस्तार झाला असून येथे २४ कोचच्या लांब पल्ल्याच्या गाड्या आता थांबतील. राष्ट्रीय महामार्गांची व्याप्ती देखील तिप्पट वाढली आहे. गोरेगाव- जोगेश्वरी लिंक रोड प्रकल्प हा प्रगती आणि प्रकृतीचा ताळमेळ आहे. ठाणे आणि बोरिवली या प्रकल्पामुळे जवळ येत आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या पालखी मार्गाचे २०० किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे १२० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.’’ पंढरीच्या विठुरायाला नमन करतानाच मोदींनी तीन कोटी लोकांना आणखी नवी घरे उपलब्ध करून दिली जातील असे सांगितले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.