मुंबई (Mumbai) : मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 'अत्यंत खराब' श्रेणीत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे (BMC) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या (Mumbai Ahmedabad Bullet Train) कामाला नोटीस पाठवण्यात आली आहे.
वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकने मुंबईतील बांधकाम व्यवसायिक व कारखान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेने ऑक्टोबर महिन्यात 27 मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. यामध्ये बांधकाम व्यवसायिकांना सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कोस्टल रोड, मेट्रो आणि बुलेट ट्रेन अशा बांधकामांचा देखील समावेश आहे. मात्र, या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला नोटीस पाठवण्यात आली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी आकडेवारीनुसार मुंबईतील सर्वाधिक प्रदूषणाची नोंद ही बीकेसी येथे झाली आहे. त्यानंतर गोवंडी, चेंबूर या विभागांचा नंबर लागतो. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील प्रदूषण सर्वात जास्त असण्याचे कारण तिथे सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम आणि तिथून उडणारी धूळ हे सांगितले जाते.
या दोन्हीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेने या बांधकामाला चारही बाजूने आच्छादन लावण्याचे आदेश दिले होते. त्यासोबतच तिथे नियमित पाण्याचा फवारा मारण्याचे आदेश देखील महापालिकेकडून ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र, वारंवार सूचना देऊनसुद्धा या नियमांची अंमलबजावणी न झाल्याने अखेर मुंबई महानगरपालिकेने बुलेट ट्रेन प्रशासनाला नोटीस दिली आहे. सोबतच यापुढे या नियमांची अंमलबजावणी न झाल्यास काम बंद करण्यात येईल अशी ताकीदसुद्धा देण्यात आली आहे.