मुंबई (Mumbai) : आगामी नवरात्रोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई पोलीस, सिडको आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मेट्रोचे उद्घाटन १४ किंवा १५ ऑक्टोबर रोजी केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून मात्र अद्याप याबाबतची घोषणा करण्यात आलेली नाही.
बेलापूर ते पेंधरपर्यंत ११ किलोमीटर मेट्रोच्या पहिला टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील मेट्रोचे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. मेट्रो सुरू करण्यासाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये सीएमआयईएस प्रमाणपत्र मिळाले होते. मात्र विविध कारणांमुळे या मार्गावर मेट्रो सुरू होऊ शकली नाही. या दरम्यान सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्थानकात अपूर्ण राहिलेले कामदेखील पूर्ण झाले आहे. २१ जून रोजीच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सिडकोला मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे बेलापूर ते पेंधरपर्यंत मेट्रो सेवा सुरू केली जाऊ शकते. तशी तयारीही मेट्रोने सुरू केली आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३०६३ कोटी आहे. नवी मुंबई मेट्रोची जबाबदारी महामेट्रोला सोपवण्यात आली आहे.
मेट्रोचे प्रवासी भाडे असे असेल :
२ किमीसाठी १० रुपये,
२ ते ४ किलोमीटरसाठी १५ रुपये भाडे असेल.
त्यानंतर प्रति २ किलोमीटरसाठी ५ रुपये भाडे वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
१० किमीपासून पुढे ४० रुपये भाडे असेल.
बेलापूर ते पेंधरपर्यंतचे भाडे ४० रुपये असणार आहे.
नवी मुंबई मेट्रो मार्गावरील स्टेशन :
बेलापूर ते पेंधर (तळोजाजवळ) पर्यंत 11 किलोमीटरचे अंतर आहे. या मार्गावर बेलापूर, सेक्टर-7 बेलापूर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर ११ खारघर, सेक्टर १४ खारघर, सेंट्रल पार्क, पेठपाडा, सेक्टर ३४ खारघर, पंचनद और पेंधर टर्मिनल ही स्टेशन आहेत.