मुंबई (Mumbai) : १० वर्षापासून रखडलेल्या माहुल पंपिंग स्टेशन (Mahul Pumping Station) प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मिठागराची सुमारे ६ हेक्टर जमीन मुंबई महानगरपालिकेला देण्याची तयारी दर्शवल्याने पंपिंग स्टेशनचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या जागेच्या बदल्यात महापालिकेकडून केंद्र सरकारला ११८ कोटींचा मोबदला द्यावा लागणार आहे.
मुंबईत मुसळधार पावसांत सखल भागात पाणी साचून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात. रेल्वे परिसरातील किंग्ज सर्कल, शीव, गांधी मार्केट, नेहरूनगर, माटुंगा, सिंधी सोसायटी, चेंबूर, कुर्ला हा सखल भाग व रेल्वे परिसरात पाणी साचते. रेल्वे रूळांवर पाणी तुंबल्याने रेल्वे सेवा ठप्प पडून जनजीवन विस्कळीत होते. यावर उपाय म्हणून महापालिकेने २००६ मध्ये ब्रिमस्ट्रोवॅड उपक्रमांतर्गत हाजी अली, रे रोड, वरळी लव्हग्रो, क्लिव्हलँड, जुहू इर्ला आणि खार येथील गझदरबंद या ठिकाणी सहा पंपिंग स्टेशन उभारली आहेत.
यामध्ये सेकंदाला हजारो लिटर पाणी समुद्रात फेकणे शक्य होत आहे. या पार्श्वभूमीवर माहुल पंपिंग स्टेशन बांधण्याचाही महापालिकेचा प्रस्ताव होता. त्यासाठी मिठागराच्या जागेसाठी महापालिकेचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. केंद्र सरकारच्या सॉल्ट कमिशनर खात्याकडे जागा मिळवण्याकरिता सातत्याने महापालिकेने प्रयत्न सुरु ठेवला होता. या पार्श्वभूमीवर मिठागराची जागा देण्याची तयारी केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने दर्शवली आहे. त्यामुळे १० वर्षानंतर माहुल पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘एमबीपीटी’ रोडच्या बाजूने माहुल खाडी, वडाळा येथे माहुल नाल्याजवळ हे पंपिंग स्टेशन उभारले जाणार आहे. नाला, खाडी जवळ असल्याने मुसळधार पावसांत येथून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करून बाहेर फेकणे सोपे जाणार आहे. त्यामुळे परिसर पूरमूक्त होण्यास मदत होईल.
या पंपिंग स्टेशनमुळे मुसळधार पावसात सखळ भाग व रेल्वे परिसरातील पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पूर्व उपनगर पूरमुक्त होण्यासाठी या पंपिंग स्टेशनची भूमिका महत्वाची असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात घेतलेल्या आढावा बैठकीत या पंपिंग स्टेशनसाठी महापालिकेकडून पाठपुरावा सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना काही महिन्यांपूर्वी दिली होती.
ही ठिकाणे पूरमुक्त होणार -
किंग्ज सर्कल, शीव, गांधी मार्केट, नेहरूनगर, माटुंगा, सिंधी सोसायटी, चेंबूर, कुर्ला आणि रेल्वे मार्ग.