मुंबई (Mumbai) : भविष्यात विद्युत वाहनांची (E-Vehicle) वाढती संख्या पाहता नवी मुंबई महापालिकेने (Navi Mumbai Municipal Corporation) शहरात चार्जिंग स्टेशन्स उभारण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात विविध ठिकाणी १० चार्जिंग स्टेशन उभाण्याचे टेंडर लवकरच जाहीर केले जाणार आहे.
महापालिकेने याआधीच केंद्र सरकारच्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनला पहिली २० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम दिले आहे. शहरात खासगी विद्युत वाहने घेणाऱ्यांची संख्याही मागील सहा महिन्यांत वाढल्याने चार्जिंग केंद्रे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात ८० विद्युत बस असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यानंतर पालिका प्रशासनाच्या ताफ्यात डिझेल, पेट्रोलऐवजी विद्युत वाहनांचा भरणा होणार आहे. प्रशासनाने तसा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मागील वर्षी महापालिकेने २० ठिकाणी विद्युत वाहन चार्जिंग केंद्रे उभारण्यासाठी टेंडर काढले होते. त्याला अनेक कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता, पण या चार्जिंग स्टेशनच्या बदल्यात पालिकेला द्यावा लागणारा मोबदला हा पॉवर ग्रीड कंपनीने जास्त दिल्याने हे टेंडर या कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार शहरात २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.
दिवाळे येथे पालिकेचे पहिले चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून, ते सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या २० चार्जिंग स्टेशनबरोबरच शहराच्या इतर भागांत आणखी १० चार्जिंग स्टेशन होणार असून, लवकरच हे टेंडर प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे महापालिकेची यंदा ३० चार्जिंग स्टेशन तयार होणार आहेत.