मुंबई (Mumbai) : गेल्या काही काळापासून सातत्याने मुदतवाढ दिलेले कचरा वाहतूक व संकलनाचे टेंडर (Tender) नवी मुंबई महापालिकेने (NMMC) अखेर प्रसिद्ध केले आहे. १३ मेपर्यंत टेंडर भरता येणार आहे.
महापालिकेने कचरा वाहतूक व संकलनासाठी मार्च २०१५ ते मार्च २०२२ पर्यंत शहरातील कचरा वाहतूक व संकलनाचे ठेकेदाराला काम दिले होते. परंतु, संबंधित ठेकेदाराची मुदत संपल्याने महापालिकेने याच ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ दिली ती २०२४ मार्चपर्यंत वाढवली. नव्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 'मे. ए. जी. एनव्हायरो' या ठेकेदाराला मुदतवाढ दिली आहे.
कचरा वाहतूक व संकलनासाठीचा विस्तृत असा प्रकल्प अहवाल महापालिकेला प्राप्त झाल्याने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्यावतीने बनवण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
नव्या टेंडर प्रक्रियेत कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. विविध पद्धतीचा कचरा वेगळा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाप्रमाणेच घरगुती घातक कचरा वर्गीकरण तसेच प्लास्टिक, लाकूड, काच, धातू अशा कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा संकलन केले जाणार आहे.
तसेच सध्या सर्वत्र इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर सुरू झाला असताना कचरा वाहतुकीसाठीही छोट्या इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर करण्याबाबतही विचार केला जाणार आहे. मागील टेंडर २४०० रुपये टनाप्रमाणे देण्यात आले होते. त्यामुळे यावेळचे टेंडर किती कोटीपर्यंत जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
कचरा वाहतूक व संकलनासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले असून, ई वाहनांचाही वापर केला जाणार आहे. गावठाणांतील कचरा संकलनाबाबतही नव्या टेंडरमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.
– डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका