मुंबई (Mumbai) : भाईंदर पश्चिम ते दहिसरला जोडणाऱ्या रस्त्याच्या १७०० कोटींच्या टेंडरची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. आवश्यक परवानग्या व भूसंपादन पूर्ण होताच पुढील दोन वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तसेच दहिसर चेकनाक्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
भाईंदर पश्चिम येथून थेट दहिसरपर्यंत जोड रस्ता व्हावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याला यश आले. मुंबई महापालिका हा रस्ता विकसित करेल, असा त्या वेळी निर्णय घेण्यात आला. रस्त्याचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर रस्त्याच्या कामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर टेंडर काढण्यात आले असून सध्या ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
भाईंदर दहिसर जोडरस्ता सहा किमी लांबीचा आहे व त्यासाठी १७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा संपूर्ण खर्च मुंबई महापालिका करणार असल्याने मिरा भाईंदर महापालिकेचा एकही पैसा यात खर्च होणार नाही. या रस्त्याचा दोन किमीचा भाग मुंबई महापालिकेच्या हद्दीत व चार किमीचा भाग मिरा भाईंदरच्या हद्दीत आहे. रस्त्याची रुंदी साठ मीटर म्हणजेच दोनशे फूट असणार आहे. सध्या भाईंदर पश्चिम येथून मुंबईला जायचे झाल्यास सात किमीचा वळसा घालून दहिसर चेकनाक्यावर जावे लागते. जोडरस्त्यामुळे हे अंतर वाचणार आहे.
या रस्त्यामुळे भाईंदरच्या नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर पुढील दोन वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून हा रस्ता पूर्णपणे टोलमुक्त असणार आहे. या रस्त्यासाठी लागणारी जमीन संपादित करण्याची जबाबदारी मिरा भाईंदर महापालिकेची आहे. यात काही जागेसाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र केंद्रात व राज्यात एकच सरकार असल्यामुळे आवश्यक परवानग्या लवकर मिळतील, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.