मुंबई (Mumbai) : नवी मुंबई शहरातील कचरा वाहतूक व संकलनाच्या ठेक्याची मुदत संपली असून नव्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत मे. एनव्हायरो ठेकेदाराला मार्च २०२३ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. यापोटी कंत्राटदाराला ७८ कोटी मोजले जाणार आहेत.
नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर महापालिकेने कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५ ते २०२२ पर्यंत असलेल्या कंत्राटाची मुदत संपल्याने महापालिकेने वर्षभरासाठी मुदतवाढ दिली आहे. आगामी काळात कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवली जाणार आहे. येत्या काही दिवसांत कचरा संकलन व वाहतूक यासाठी नव्याने होणाऱ्या टेंडर प्रक्रियेमध्ये कचरा वर्गीकरणाची व्याप्ती वाढवून विविध पध्दतीचा कचरा वेगळा करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
शहरात ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरण केले जाते. आता घरगुती घातक कचरा, सुका व घातक कचऱ्याचे वर्गीकरण तसेच नव्याने प्लास्टिक, लाकूड, काच, धातू अशा कचऱ्याचे वर्गीकरण करुन कचरा संकलन केले जाणार आहे. अखिल भारतीय स्वराज्य स्थानिक संस्थेच्या सहकार्याने महापालिकेने विस्तृत कचरा वाहतूक व संकलनाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. नवी मुंबई शहरात शहर सुशोभिकरणाप्रमाणेच पर्यावरणास पूरक अशा सुधारणा केल्या जाणार आहेत. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर आता ‘रस्त्यावर शून्य कचरा‘ नजरेसमोर ठेवून व ओला-सुका कचरा वेगळा करण्याचे महापालिकेने बंधनकारक केलेले आहे. नव्याने काढण्यात येणाऱ्या कचरा वाहतूक व संकलनाबाबत महापालिकेने व्यापक नियोजनाला सुरुवात केली आहे.
कचरा वाहतूक व संकलन कामाची मुदत संपली असून नव्याने टेंडर प्रक्रिया राबवताना कचरा वर्गीकरण व संकलनाबाबत अत्याधुनिक पध्दतीचा अवलंब करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
- बाबासाहेब राजळे, उपायुक्त घनकचरा विभाग