Narendra Modi In Mumbai News मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी 29,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे.
ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आणि गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे बोरिवली आणि ठाणे दरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ठाणे आणि बोरीवली प्रवास दीड तासावरून अवघ्या १५ मिनिटांत करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर १४ हजार कोटींचा खर्च होणार आहे.
मुलुंड ते गोरेगाव लिंक रोड (GMLR PROJECT) या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुंबई महापालिका सुमारे ८ हजार कोटींचा खर्च करणार आहे. याअंतर्गत बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भूगर्भातून दुहेरी बोगदा खणण्यात येणार असून त्यातून पश्चिम ते पूर्व अशी कनेक्टीविटी मिळणार आहे. उद्यानाच्या गोरेगाव चित्रनगरी ते मुलूंड खिंडीपाडा असे दुहेरी बोगद्याचे काम होणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाला पूर्व द्रुतगती महामार्गाशी जोडले जाणार आहे.
तसेच नवी मुंबई येथील गतिशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनलची आणि कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाचे पंतप्रधान मोदी भूमिपूजन करणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील प्लॅटफॉर्म 10 आणि 11 चा विस्ताराचे यावेळी लोकार्पण करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी सुमारे 5600 कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचा नारळ फोडणार आहेत. तसेच मुंबईत इंडियन न्यूजपेपर्स सोसायटी (आयएनएस) टॉवर्सचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.