नागपूर (Nagpur) : भिंवडी-निजामपूर महापालिकेतील तत्कालीन सहाय्यक आयुक्तांनी लाखो रुपयांची रक्कम आगाऊ घेऊन त्याचा अपहार केल्याचे प्रकरण विधानसभेत समोर आल्यानंतर या प्रश्नावर सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीच सरकारला धारेवर धरत चौकशीची मागणी लावून धरली. त्यावर प्रभारी सहायक आयुक्तांची विभागीय चौकशी सुरू असून त्याचा अहवाल १५ दिवसांच्या आत मागविण्यात येईल. या चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत (Uday Samany) यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील भिंवडी महानगरपालिकेतील प्रभाग समिती क्रमांक ५ चे तत्कालीन सहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे यांनी लेखा विभागातून सफाई कामगारांच्या वेतनासाठी लाखो रुपये आगाऊ उचलून गैरव्यवहार केल्यासंदर्भात आमदार नीलेश लंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी या प्रश्नाला उत्तर देताना सामंत यांनी ३० दिवसांच्या आत विभागीय चौकशी करून अहवाल मागवला जाईल. चौकशीत दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले.
या प्रश्नाच्या चर्चेत सहभागी झालेल्या भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि योगेश सागर यांनी या प्रकरणात सरकारलाच धारेवर धरले. यावेळी अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करीत सरकारला निर्देश दिले. ते म्हणाले, जर अधिकारी दोषी असेल तर चौकशी नंतर कशी होऊ शकते. तो दोषी असेल तर त्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यामुळे चौकशी चालू आहे की दोष सिद्ध झालेला आहे, अशी विचारणा करत आपण कोणती कारवाई केली याची माहिती द्या, असे नार्वेकर म्हणाले.
यावेळी उदय सामंत म्हणाले, संबंधित अधिकाऱ्याला नोटीस दिली आहे. त्याची विभागीय चौकशी सुरु आहे. मात्र, ३० दिवसांत चौकशीचा अहवाल घेणार होतो तो आता १५ दिवसांत घेतला जाईल. त्यासंदर्भात सूचना दिल्या जातील आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
सोष्टे यांना प्रभारी सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती क्र.५ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला असताना नाले आणि गटार सफाई कामासाठी मजुरांचे वेतन देण्याकरिता त्यांनी घेतलेल्या अग्रीमाचा ताळमेळ सादर केलेला नाही. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास महानगरपालिकेमार्फत दिलेल्या नोटिसीचा खुलासा प्राप्त न झाल्यामुळे त्यांच्या मासिक वेतनातून दरमहा रक्कम कपात करण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशास अनुसरून कार्यवाही सुरू असल्याचेही सामंत यांनी सांगितले.