मुंबई (Mumbai) : ठाणे ते बोरीवली या भुयारी मार्गासाठी १८ हजार ८३८ कोटी रुपयांच्या प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या सहा पदरी दुहेरी भुयारी मार्गाची एकूण लांबी ११. ८५ किमी इतकी असून, एकूण १८ हजार ८३८ कोटी ४० लाख अशा किंमतीच्या प्रकल्पाची एमएमआरडीएमार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या भुयारी मार्गामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास फक्त 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) कडून कर्ज घेतले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गाची पायाभरणी करण्यात आली होती. याद्वारे ठाणे ते बोरिवली प्रवासात 1 तासांची बचत होणार आहे. त्यामुळे थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गामुळे घोडबंदर रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होणार आहे.
भारतातील हा सर्वात लांब आणि मोठा शहरी भुयारी मार्ग आहे. प्रकल्पाची एकूण लांबी 11.8 किमी आहे, त्यापैकी 10.25 किमीचा बोगदा आहे. दोन्ही बोगद्यांमध्ये दोन मार्गिका आणि एक आपत्कालीन मार्गिका असणार आहे.. त्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास विनाथांबा आणि सिग्नलरहित होणार आहे. 2028 पर्यंत या प्रकल्प पूर्ण करण्याचे टार्गेट आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नऊ प्रकल्पांच्या निधीबाबत महत्वाचा निर्णय झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अर्थात एमएमआरडीएने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) कडून 31,673.79 कोटींचे कर्ज घेतले आहे.
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील नऊ प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आर्थिक निधी उभारण्याकरिता हे कर्ज घेण्यात आले आहे. 31,673.79 कोटींच्या कर्जातील सर्वाधिक निधी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी दिला जाणार आहे. अतिरिक्त निधी इतर आठ प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी खर्च केला जाणार आहे.