मुंबई (Mumbai) : मुंबईकरांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून (BMC) शहरात विविध ठिकाणी जलबोगद्यांचे (Water Tunnel) जाळे विणले जात आहे. याच अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील येवई जलाशयातून मुलुंडपर्यंत तब्बल २१ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्यात येणार आहे. (Yevai Dam To Mulund Water Tunnel)
या प्रकल्पाच्या बांधकामासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात येवई जलाशय ते भिवंडीतील कशेळी असा १४ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कशेळी ते मुलुंड या दरम्यान ७ किलोमीटर लांबीचा जलबोगदा बांधण्याचे नियोजन आहे.
या जलबोगद्याच्या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना तसेच इतर संस्थांना काही आक्षेप असल्यास महिन्याभरात सूचना व हरकती कळवण्याचे आवाहन केले आहे. या जलबोगद्याच्या प्रकल्पासाठी खिडाई यंत्राचा वापर केला जाणार आहे. तसेच येत्या १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन आहे.
हा जलबोगदा १६.६५ मीटर व्यासाचा जमिनीखाली १२८ ते १३४ मीटर बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी टेंडर काढण्यात आले होते आणि वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली आहे. पावसाळा संपल्यावर या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. शेकडो इमारतींच्याखालून हा बोगदा जाणार असल्याने याबाबतची माहिती रहिवाशांना आवश्यक आहे.
मुंबईला एकूण सात तलावांमधून दररोज ३८५० एमएलडी पाणी पुरवठा होतो. हे पाणी ठाणे जिल्ह्यातून पाईपलाईनद्वारे मुंबईत येते. पाईपलाईन खूप जुन्या झाल्या असून गंज सुद्धा पकडला आहे. यामुळे वारंवार गळतीची समस्या निर्माण होते. तसेच पाईपलाईनमधून पाणी चोरी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. यामुळे दररोज ३८५० एमएलडी पाण्यापैकी ८०० एमएलडी पाणी मुंबईकरांपर्यंत पोहोचतच नाही.
जलबोगदा पूर्ण झाल्यावर भातसा धरणातून थेट पांजरपोळ जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येईल. या जलबोगद्यामुळे पाईपलाईनला लागणारी गळती आणि पाणी चोरीच्या घटनांना आळा बसणार आहे.
पाणी पुरवठ्यासाठी जलबोगदे बांधणारी मुंबई महानगरपालिका भारतातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था आहे. तर १०० किलोमीटर जलबोगदे असणारे मुंबई महानगर जगातील दुसरे शहर आहे. जगभरातील सर्वात मोठ्या पाणीपुरवठा योजनांमध्ये मुंबईची पाणीपुरवठा व्यवस्था गणली जाते.
पाण्याच्या वहनासाठी जलबोगदे बांधणारी बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था आहे. जलवितरण व्यवस्थेतील व्यवहार्य पर्याय म्हणून जलबोगद्यांचा वापर केला जात असून जलबोगद्यांद्वारे पाणी वहन केल्याने गळती व पाणीचोरीला आळा बसतो आहे.
एकूण ९० किलोमीटर लांबीच्या प्रबलित सिमेंट काँक्रिट जल बोगद्यांतून दररोज पाणी आणले जाते. त्यात अलीकडेच अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याची भर पडली आहे.