मुंबई (Mumbai) : ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस (Vande Bharat Express) आजच्या आधुनिक भारताचे एक भव्य चित्र आहे. ते भारताच्या गती आणि विकासाचे प्रतिबिंब आहे. भारत किती वेगाने प्रगती करत आहे, हे तुम्ही पाहू शकता. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थक्षेत्राला नक्कीच चालना मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल केले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सीएसएमटी ते साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर या दोन वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले, या वेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी यांनी सीएसएमटी काल येथून दुपारी दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवला. या सोहळ्यानंतर त्यांनी सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचेही लोकार्पण केले. तत्पूर्वी मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, वंदे भारत एक्स्प्रेस समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत असून ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस मुंबई आणि पुण्यासारख्या आर्थिक केंद्रांना भक्तीच्या केंद्रांशी जोडतील. महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आणि कार्यालयात जाणारे लोक, शेतकरी आणि भाविक यांना याचा फायदा होईल, असे ते म्हणाले.
देशात मेट्रोचा विस्तार होत आहे, नवीन विमानतळ बनवले जात आहेत. आज नववी आणि दहावी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस समर्पित करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि येथे जमलेले सगळेच लोक या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की, आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी आणि मुंबईसाठी खूप मोठा आहे. आज पहिल्यांदाच दोन वंदे भारत एक्स्प्रेस एकत्र सुरू झाल्याचे मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश मूर्ती भेट देत स्वागत केले. कार्यक्रमास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप मुंबई अध्यक्ष आशीष शेलार उपस्थित होते.
डबल इंजिनमुळे प्रगती वेगवान
महाराष्ट्रात पर्यटन आणि तीर्थयात्रा यांना प्रोत्साहन देणाऱ्या या दोन एक्स्प्रेस आहेत. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन, नाशिक, त्र्यंबकेश्वर या सर्व ठिकाणी भेट देणे ‘वंदे भारत’मुळे सुकर आणि सुखकर होणार आहे. सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारतमुळे आई तुळजाभवानी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, पंढरपूर या ठिकाणी जाणे सोपे होणार आहे. मला हा विश्वास आहे, की डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग वाढेल. राज्यात रोजगाराच्या संधीही लवकरच उपलब्ध होणार आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे आभार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे या वेळी आभार मानले. तसेच त्यांच्या ५ मिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे जे स्वप्न आहे, त्यात महाराष्ट्र १ मिलियन डॉलरची भर टाकेल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात सर्वात मोठे रेल्वेचे जाळे आहे. महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी पहिल्यांदाच रेल्वेसाठी मिळाले आहेत. हे सामान्य नागरिकांचे सरकार आहे, फक्त केंद्राच्या पाठिंब्यामुळे सर्व शक्य झाल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाविक आणि प्रवाशांसाठी ही एक्स्प्रेस ‘मैलाचा दगड’ ठरेल. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्राला रेल्वेसाठी १३ हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याबद्दल मी पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करतो.
कोणी कल्पना केली नसेल, की भारतात अशा प्रकारची एक्स्प्रेस धावेल; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही किमया आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदी यांचे नाव इतिहासात लिहिले जाईल, असेही ते म्हणाले.