मुंबई (Mumbai) : शिवडी क्रॉस रोड येथील तब्बल 1270 झोपड्यांच्या पुनर्विकासातील अडसर दूर झाला आहे. येथील 696 झोपड्या कधी व कशा रिकाम्या करणार याची माहिती झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने (SRA) प्रतिज्ञापत्रावर सादर करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
तसेच 278 झोपड्या रिकाम्या करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. ही प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार याचा तपशील महापालिकेने सादर करावा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. याबाबतीत पुढील सुनावणी 27 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.
न्या. गौतम पटेल व न्या. कमल खथा यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. एसआरएकडून अॅड. विजय पाटील, अॅड. जगदीश रेड्डी व महापालिकेकडून अॅड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली.
या झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी 1998 मध्ये म्हणजे 25 वर्षांपूर्वी एसआरकडून मंजुरी मिळाली. दोन विकासकांनंतर मेरू मॅगनम कन्स्ट्रक्शन (विमल बिल्डर) यांना या झोपड्यांच्या पुनर्विकासाचे काम मिळाले. मात्र काही तांत्रिक परवानग्यांमध्ये या झोपड्यांचा विकास रखडला होता. अखेर यासाठी विकासकाने अर्ज दाखल केला. ही पुनर्विकास योजना 11 फेब्रुवारी 1998 रोजी एसआरएने मंजूर केली.
सुरुवातीला लेटर ऑफ इंटेंट मेसर्स सताधर कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने जारी झाले. नंतर दुसऱ्या एका विकासकासोबत पुनर्विकासाचा करार झाला. 2003 मध्ये मेरीट मॅगनम कन्स्ट्रक्शनसोबत सोसायटीने पुनर्विकासाचा करार केला. त्यानुसार एसआरएने 2010 मध्ये मॅगनमच्या नावाने लेटर ऑफ इंटेंट जारी केले. 50 टक्के एसआरए प्रकल्पावर काम सुरू आहे.
येथील काही झोपड्यांना संक्रमण शिबिरात हलवण्यात आले आहे, तर काहींना संक्रमण शिबिराचे भाडे दिले जाते. मात्र काही तांत्रिक परवानग्यांमुळे याचा पुनर्विकास रखडला आहे. या परवानग्या देण्याचे आदेश न्यायालयाने संबंधित प्रशासनाला द्यावेत, जेणेकरून हा विकास पूर्ण करता येईल, असे विकासकाचे म्हणणे आहे.