मुंबई (Mumbai) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यानात लवकरच काचेच्या टनेलमधून देशविदेशी रंगबेरंगी माशांसह पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवता येणार आहे.
५,५०० चौरस फूट जागेवर सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय राणीबागेत उभारण्यात येणार आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली असून त्यास पाच कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र आचार संहिता लागू असल्याने पुढील प्रक्रिया राबवणे शक्य नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
राणीबाग व प्राणीसंग्रहालय हे देशविदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. या प्राणीसंग्रहालयात २५ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत.
याशिवाय २५६ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्र बलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीसह मोठ्यांचेही राणीबाग आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
राणीबागेत दररोज ७ ते ८ हजार पर्यटक भेट देतात. सणासुदीच्या काळात, सार्वजनिक सुट्टी व शनिवार-रविवारी तर पर्यटकांचा आकडा ३५ ते ४० हजारांपर्यंत जातो. त्यात आता ५,५०० चौरस फूट जागेवर सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. यात एक टनेल १४ मीटर तर दुसरे टनेल ३६ मीटर लांब असणार आहे.
त्यातच आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील, त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत जाईल. त्यामुळे राणीबागेतील प्राणी-पक्ष्यांची तसेच पेंग्विनची धम्मालमस्ती अनुभवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक हजर होतील.
२६ जुलै २०१६ मध्ये कोरियावरून ८ होबोल्ट पेंग्विन आणले होते. राणी बागेतील पेंग्विन आता बच्चेकंपनीसह मोठ्यांचे आकर्षण ठरत आहे. गेल्या ८ वर्षांत पेंग्विनची संख्या २५ पर्यंत पोहोचली आहे. पेंग्विनसाठी सध्या २२५ चौरस मीटर जागा उपलब्ध आहे. परंतु पेंग्विनची संख्या वाढत असल्याने त्यांना जागा अपुरी पडू लागली आहे.
त्यामुळे पेंग्विन कक्षाशेजारी उपलब्ध जागेत ६० चौरस मीटरने वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पेंग्विन खेळण्याबागडण्यासाठी २२५ चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे.