मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसाठी लागणारी साधनसामग्री मुंबईत प्रकल्पाच्या ठिकाणीच तयार करण्यासाठी महापालिकेने स्वतःच कास्टिंग यार्ड सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेकडून आगामी काळात वर्सोवा ते दहिसर, दहिसर ते मीरा रोड आणि माहीम ते वांद्रे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे असे मोठे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे १८,६९७ कोटी रुपये आहे. प्रकल्प खर्चाच्या सुमारे १ ते २ टक्के खर्च प्रकल्पांच्या कास्टिंग यार्डवर होतो, त्यामुळे या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीची शेकडो कोटींची बचत होणार आहे.
गोखले पूल, विद्याविहार, सीएसएमटी स्थानकातील हिमालयीन पूल अशी कामे करताना सामानाची जुळवाजुळव करण्यात अडचण निर्माण झाली होती. तसेच खर्चातही वाढ झाली. त्यात भविष्यात गोरेगाव मुलुंड लिंक रोड, वसोॅवा-दहिसर, दहिसर-भाईंदर उत्तन मार्ग प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. पुलाच्या कामांसाठी लागणारी साधनसामग्री मुंबईतच तयार करण्यासाठी महापालिका आता स्वत:चे कास्टिंग यार्ड बनवणार आहे. यासाठी जमीन उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी महापालिका कास्टिंग यार्ड बनवणार असून या जागांचे भाडे महापालिकेकडून ठरलेल्या दरानुसार जमीन मालकाला दिले जाणार आहे.
महापालिकेकडून आगामी काळात वर्सोवा ते दहिसर, दहिसर ते मीरा रोड आणि माहीम ते वांद्रे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे असे मोठे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. प्रकल्पाच्या बांधकामासाठी पुलाचा काही भाग तयार करण्यासाठी कास्टिंग यार्डची आवश्यकता आहे. प्रकल्प खर्चाच्या सुमारे १ ते २ टक्के खर्च प्रकल्पांच्या कास्टिंग यार्डसाठी लागणार आहे. महापालिकेचे सध्या तीन मोठे प्रकल्प प्रक्रिया स्तरावर आहेत. या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे १८,६९७ कोटी रुपये आहे. महापालिकेला दहिसर वर्सोवा लिंक रोडच्या कास्टिंग यार्डसाठी जमीन उपलब्ध झाली नाही तर सुमारे २५६ कोटी रुपये खर्च करावे लागतील. दहिसर ते मीरा रोडसाठी कास्टिंग यार्डसाठी ३ वर्षांचे भाडे देण्यासाठी २२४ कोटी रुपयांची तरतूद केली होती. तर गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या बोगद्याच्या कामासाठी बीएमसीने कास्टिंग यार्डसाठी कंत्राटदाराला नुकतेच १३४ कोटी रुपये दिले आहेत. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ६३०१ कोटी रुपये आहे.