मुंबई (Mumbai) : स्वच्छ-सुंदर दुर्गंधीमुक्त गोराई-मनोरीसाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) पुढाकार घेतला असून, याठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय या परिसरातील सांडपाणी प्रक्रिया करूनच समुद्रात सोडले जाणार आहे. यासाठी महापालिका सल्लागार नेमणार असून या कामासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे.
मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी महापालिकेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये समुद्रात थेट जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच पाणी समुद्रात सोडले जाणार आहे. यामध्ये गोराई, मनोरी परिसरात मलनिस्सारण वाहिन्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर आल्याने या भागातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सांडपाणी समुद्रात सोडण्यात येत असल्याने समुद्री जिवाला धोका आहे. त्यामुळे गोराई व मनोरी परिसरात मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून सल्लागाराच्या सल्ल्यानुसार मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात येणार असून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते मलनिस्सारण वाहिन्यांच्या माध्यमातून समुद्रात सोडण्यात येणार आहे. ट्रीटमेंट प्लॉट उभारणे, मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, प्लांट उभारण्यास किती खर्च, मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी किती खर्च व कशा प्रकारे टाकाव्यात, कुठे टाकाव्यात यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.