मुंबई (Mumbai) : कोस्टल रोडच्या बोगद्यांमधील गळती रोखण्यासाठी जॉईंटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले 'ग्राऊंटिंग इंजेक्शन' देण्यात येणार आहे. याच तंत्रज्ञानाने रस्त्यावर पडलेले छोटय़ा चिरादेखील भरण्यात येणार आहेत. शिवाय आवश्यकता भासल्यास नव्या तंत्रज्ञानाने डागडुजी करण्यात येणार असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामुळे कोस्टल रोडचे बोगदे आता 'वॉटरप्रूफ' होणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या 'धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज' सागरी मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून एकूण 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. तब्बल 14 हजार कोटींवर रुपये खर्च करून कोस्टल रोड बांधण्यात आलेल्या या मार्गाचे वरळी ते मरीन ड्राईव्ह असा एक मार्गाचा टप्पा 11 मार्च रोजी वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला आहे, मात्र या मार्गावर आताच भेगा पडल्याचे समोर आल्यानंतर भुयारी मार्गाच्या सांध्यांमध्ये गळती होत असल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून डागडुजी करण्यात येत आहे. सध्या वरळी ते मरीन ड्राईव्ह ही 9 किमी मार्गिका 12 मार्चपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.
कोस्टल रोडच्या बांधकामात 2.072 किमीचे दोन महाकाय बोगदे जमिनीखाली 70 मीटर खाली खोदण्यात आले आहेत. यामध्ये जोडकामाच्या सांध्यांमध्ये गळती झाल्याचे समोर आले आहे. मात्र पॉलिमर ग्राऊटिंग इंजेक्शन दिल्यामुळे दोन्ही ठिकाणची गळती आणि तीन ठिकाणी झिरपणारे पाणी बंद झाले आहे. तर या ठिकाणी असणाऱ्या एकूण 50 जॉईंटची तपासणी करून गरज भासल्यास आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. दरम्यान, या गळतीमुळे कोस्टल रोडला कोणताही धोका नसून वाहतुकीवरदेखील कोणताही परिणाम झाला नसल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.