मुंबई (Mumbai) : मुंबईतील सुमारे १ लाख मॅनहोलवर मुंबई महापालिका आता संरक्षक जाळ्या बसवणार आहे. यासाठी स्टीलच्या मजबूत जाळ्या तयार करण्यात येणार आहेत. या मजबूत प्रतिकृतीला ( प्रोटोटाइप ) प्रशासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे.
महापालिकेच्या क्षेत्रात मलनिस्सारण विभागाचे सुमारे 74 हजार आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाअंतर्गत सुमारे 25 हजार मॅनहोल आहेत. या ठिकाणी अतिवृष्टीत पाणी तुंबलेले असल्यास मॅनहोलचा अंदाज येत नसल्याने दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून मॅनहोलवर मजबूत संरक्षक जाळ्या बसवण्यात येत आहेत. शिवाय या संरक्षक जाळ्या चोरीला जावू नयेत यासाठी साखळीने बांधून लॉक करण्यात येतात. तरीही लोखंडी मजबूत जाळ्या समाजकंटकांकडून उखडून विकण्याचे प्रकार घडत असल्यामुळे आता सर्व मॅनहोलमध्ये स्टीलच्या मजबूत जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून शहर विभागात 'डिजिटल स्मार्ट मॅनहोल' बसवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामध्ये मॅनहोलचे झाकण उघडले गेल्यास कंट्रोल रूमध्ये अलार्म वाजणार आहे.
मॅनहोलची झाकणे चोरीला जाण्यासारख्या प्रकारामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून मॅनहोलच्या आत संरक्षक जाळी लावण्याची मोहीम यापूर्वीच सुमारे 1,900 मॅनहोलच्या ठिकाणी राबविण्यात आली आहे. यासोबतच महानगरपालिकेकडून सर्व विभागांमध्ये विशेष मोहीम राबवून हरवलेल्या मॅनहोलच्या झाकणांची ठिकाणेही शोधण्यात आली आहेत. मॅनहोल्सची झाकणे चोरी होण्याच्या ठिकाणी सातत्याने पाहणी मोहीम राबवण्यात येत आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रोटोटाईपसाठी या सर्व 1900 मॅनहोलच्या जाळ्यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार अधिक मजबूत आणि वाजवी अशा मॅनहोलच्या संरक्षक जाळ्या तयार करण्यासाठी विविध प्रयोग केले आहेत. त्यामध्ये कास्ट आयर्न, माईल्ड स्टील, स्टेलनेस स्टील अशा विविध पद्धतीच्या धातूंचा वापर करून या संरक्षक जाळ्या तयार करण्यात आल्या आहेत.