मुंबई (Mumbai) : कुर्ला आणि चांदिवली परिसरातील नागरिकांना येत्या वर्षभरात दोन नवीन उद्याने मिळणार आहेत. एक उद्यान चांदिवली संघर्ष नगर येथे तर दुसरे उद्यान कुर्ला स्थानकाजवळ विकसित करण्यात येणार आहे. ही दोन्ही मैदाने विकसित करण्यासाठी टेंडर मागविण्यात आले होते.
टेंडर प्रक्रियेनंतर ठेकेदार निश्चित करण्यात आला असून ११ महिन्यात या मैदानांचा विकास केला जाणार आहे. सहा महिने देखभालीसह या कामासाठी महापालिका ५ कोटी ३६ लाख रुपये खर्च करणार आहे. महापालिका आयुक्तांनी नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या दोन्ही उद्यानांच्या सुशोभीकरणासोबतच पदपथ, संरक्षक भिंत, संरक्षक जाळ्या, बैठक व्यवस्था, पर्जन्य जलवाहिन्यांची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, मल्लखांब, कुस्ती अशा खेळांसाठीची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृहे तयार करण्यात येणार असून, दिव्यांची रोषणाई, कचरापेटी लावणे, हिरवळीची कामे देखील करण्यात येणार आहेत.
चांदिवली संघर्ष नगरमधील दोन एकर जागेवर उद्यान साकारण्यात येणार आहे. हा भूखंड विकास आराखड्यात मैदानासाठी आरक्षित करण्यात आला होता. त्याची अखेर आता अंमलबजावणी होणार आहे. तसेच कुर्ला स्थानकाजवळ पश्चिम दिशेला एस.जी.बर्वे मार्गावर असलेल्या गांधी मैदानाचाही विकास करण्यात येणार आहे. ३५ हजार चौरस मीटर जागेवरील या मैदानात सर्व सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत.
कुर्ला स्थानकाला लागून असलेल्या बस डेपोच्या मागे ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत होती. देखभालीअभावी अतिक्रमण झाले होते. गांधी मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कुर्ला येथील नागरिकांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर हा भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. आता या मैदानाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.