मुंबई (Mumbai) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा वांद्रे येथील मातोश्री, कलानगर परिसर पावसाळ्यात तुंबणार नाही याची खबरदारी मुंबई महापालिकेकडून घेण्यात येत आहे. महापालिकेकडून या परिसरात पाण्याचा जलद गतीने निचरा होणारी पम्पिंग व्यवस्था उभारत आहे. १६ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च त्यासाठी करण्यात येत आहे.
२६ जुलै २००५ मध्ये मुंबईची तुंबई झाली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीसह संपूर्ण कलानगर परिसरात पाणी तुंबले होते. सगळीकडे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुंबईतील या पूरपरिस्थितीवर तोडगा म्हणून पालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात सात ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या पावसाळी पाण्याचा निचरा जलदगतीने करण्यासाठी जास्त क्षमतेचे पम्पिंग स्टेशन बांधण्याचे काम सुरू आहे.
गेल्या १७ वर्षांत त्यापैकी ६ पम्पिंग स्टेशन उभारण्यासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केला गेला आहे. २६ जुलैची पुनरावृत्ती टाळण्याच्या या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पालिकेने मातोश्री परिसरात पावसाळ्यात पाण्याचा जलदगतीने निचरा करण्यासाठी भाडेतत्त्वावरील पम्पिंग व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय मातोश्री परिसरात मिठी व वाकोला नदीचा प्रवाह उलटून जलमय स्थिती होऊ नये यासाठी कलानगर परिसरातील पातमुखांवर पेनस्टॉक प्रकारचे १० गेट बसवण्यात येणार आहेत.
गतवर्षीसुद्धा असे गेट आणि दोन वर्षांसाठी भाडे तत्त्वावरील पम्पिंग व्यवस्था वापरण्यात आली. या भाडे तत्त्वावरील पम्पिंगचा कंत्राट कालावधी संपुष्टात आल्याने नवीन कंत्राटदार नेमण्यात येत आहे. या कंत्राटदाराला हे काम १६ कोटी ६६ लाख रुपये दराने देण्यात येणार आहे. हे काम २५ मे २०२२ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत पूर्ण करण्यात येईल.