मुंबई (Mumbai) : पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने 82 अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून, 193 इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. महापालिकेने नोटीस बजावूनही कार्यवाही न करणाऱ्या 27 इमारतींचे वीज, पाणी कापले आहे, तर 217 प्रकरणांत कार्यवाही सुरू असून 101 प्रकरणे विविध न्यायालयांत प्रलंबित असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पावसाळ्याआधी मुंबईतील इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. यामध्ये मोठी दुरुस्ती आवश्यक असलेल्या इमारतींचा समावेश 'सी-2' श्रेणीत करून तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात येतात, तर जीर्ण झालेल्या इमारतींचा समावेश 'सी-1' म्हणजेच 'अतिधोकादायक' श्रेणीत करून या इमारती तत्काळ रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात येतात. नोटीस बजावूनही या इमारती रिकाम्या न केल्यास वीज-पाणी कापण्याची कारवाई करण्यात येते. ही कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. दुर्घटना टाळण्यासाठी मुंबईतील 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इमारतीच्या आरसीसी फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत कॉलम झुकल्यासारखे दिसत असतील, इमारतीचे बीम झुकल्यासारखे दिसणे आणि इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणे, इमारतीचा तळमजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे, इमारतीच्या कॉलममधील भेगा वाढत असल्याचे दिसून येणे, इमारतीच्या कॉलममधील काँक्रीट पडत असल्याचे दिसणे, इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखे दिसणे, इमारतीचा आरसीसी चेंबर्स (कॉलम, बीम) व विटांची भिंत यात सांधा/भेगा दिसणे, स्लॅबचे किंवा बीमचे तळमजल्याचे काँक्रीट पडत असल्याचे दिसणे, इमारतीत काही विशिष्ट आवाज होणे ही वास्तव्यास धोकादायक इमारतींची प्रमुख लक्षणे आहेत.
मुंबई शहर - 32 अतिधोकादायक इमारती
पश्चिम उपनगर - 65 अतिधोकादायक इमारती
पूर्व उपनगर - 120 अतिधोकादायक इमारती