मुंबई (Mumbai) : मुंबईकरांना मरीन ड्राईव्ह ते मिरा भाईंदर थेट प्रवास करता यावा यासाठी वर्सोवा - दहिसर, दहिसर - मिरा भाईंदर उन्नत मार्ग बांधण्यात येत आहे. यासाठी तब्बल २४ हजार कोटींचा खर्च असून या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली असून २०२९ पर्यंत हा उन्नत मार्ग नागरिकांच्या सेवेत येईल, असा विश्वास मुंबई महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉ इकबाल सिंग चहल यांनी व्यक्त केला.
मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाची सुरुवात झाली. कोस्टल रोड प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत आल्यानंतर प्रियदर्शनी पार्क ते वरळी पर्यंत थेट प्रवास करणे शक्य होणार आहे. वरळी ते वांद्रे सी लिंक प्रवासी सेवेत असून वांद्रे ते वर्सोवा उन्नत मार्गाचे काम एमएमआरडीच्या माध्यमातून होणार असून वर्सोवा दहिसर व दहिसर ते मिरा भाईंदर उन्नत मार्ग प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. वर्सोवा ते दहिसर सहा पॅकेज मध्ये काम होणार असून दहिसर ते मिरा भाईंदरचे काम सातव्या पॅकेजमध्ये होणार आहे.
गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन लाईन्स दरम्यान चार लेनची एक मार्गिका १९ फेब्रुवारीपासून प्रवासी सेवेत येणार आहे. या मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी यावेळी दिली.