मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने गोरेगावमधील टोपीवाला मंडईच्या पुनर्विकासासाठी १६० कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. प्रकल्प खर्चात तब्बल ३० कोटींची वाढ झाली आहे. याठिकाणी तळमजल्यासह १६ मजल्यांची इमारत बांधण्यात येणार आहे.
बोरिवली पश्चिम येथील 'पी दक्षिण' विभागातील पहाडी गाव परिसरात महापालिकेने टोपीवाला मार्केट विकसित केले होते. मुंबईतील मोठ्या मार्केटपैकी एक असलेल्या या मार्केटची उभारणी महापालिकेकडून करण्यात आली होती. गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या या मंडईचा पुनर्विकास करण्याची महापालिकेची योजना आहे. ही मंडई २०१८ मध्ये पाडण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांपासून हा पुनर्विकास रखडला आहे. महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी १३१ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र आता या प्रकल्पाचा खर्च १६० कोटींहून अधिक होण्याची अंदाज आहे. महापालिकेने नुकतेच हे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
टोपीवाला मार्केटच्या इमारतीची रचना ही तळमजला अधिक ३ मजले अशी आहे. येथील पार्किंगची व्यवस्थाही अपुरी पडत आहे. त्यामुळे पुनर्विकास करताना पार्किंगची क्षमताही वाढवण्यात येणार आहे. महापालिकेने यासाठी ई-टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. यावर सुमारे १५ कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. पुनर्विकास झाल्यावर मंडईच्या पहिल्या व दुसर्या माळ्यावर पार्किंग सुविधा आणि तळमजल्यावर अद्ययावत मंडई, निवासी डॉक्टरांसाठी खोल्या असणार आहेत. तळमजल्यासह १६ मजल्याची ही इमारत असणार आहे. इमारत परिसरात सीसीटीव्ही, योगा केंद्र, शॉपिंग सेंटर, सभागृह आणि व्यायामशाळा असणार आहे.