मुंबई (Mumbai) : रस्ते दुरुस्तीसाठी कंत्राटदार निश्चित झाल्यानंतर कामाच्या ऑडीटसाठी सल्लागार नियुक्त केल्याचा कित्ता महापालिकेने आश्रय योजनेतही गिरवला आहे. सहा महिन्यांपुर्वी आश्रय योजनेनंतर सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्वसनासाठी कंत्राटदार निश्चित झाल्यानंतर आता महापालिकेने प्रकल्पसल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी टेंडर मागविले आहेत. दोन प्रकल्पांवर सल्लागार नियुक्तीसाठी महापालिका सुमारे 60 कोटीहून अधिक खर्च करणार आहे.
जून 2021 महापालिकेने पालिकेने दक्षिण मुंबईतील ज्या वसाहतींच्या पुनर्विकासाला मंजूरी दिली त्या वसाहतींसाठी महापालिका आता सल्लागार नियुक्त करण्यात आले आहे. यात पालिकेच्या डोंगरी,महम्मद अली मार्गासह, फोर्ट परीसरातील वसाहतींचा समावेश आहे. या वसाहतींचा पुनर्विकास करताना त्या कामावर देखरेख ठेवणे, आराखड्यांना तसेच विविध मंजुऱ्या मिळवण्यासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती केली जात आहे. साधारण प्रकल्प खर्चाचा 5 ते 6 टक्क्यां पर्यंत शुल्क आकारले जाते. त्यातील एका प्रकल्पाचा खर्च 647 कोटी आणि दुसऱ्या प्रकल्पांचा खर्च 437 कोटी असा आहे. या दोन्ही प्रकल्पांची मिळून 1 हजार कोटीहून अधिक किंमत असल्याने सुमारे 60 टक्क्याहून अधिक रक्कम पालिका सल्लागारांवर खर्च करणार आहे.
सल्लागारांसाठी 250 कोटी
सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प 4 हजार 251 कोटी रुपयांचा असल्याचे महापालिकेच्या अर्थसंकल्पात नमुद करण्यात आले आहे. तर, आगामी वर्षात त्यासाठी 1 हजार 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या काळात सर्वच वसाहतींसाठी सल्लागार नियुक्त केला जाणार असल्याने तब्बल 250 कोटी रुपयांच्या आसपास रक्कम सल्लागारावर महापालिका खर्च करणार आहे.
- फोर्ट परीसरातील राजवाडकर स्ट्रीट,पलटन रोड,वालपाखाडी येथे 1 हजार 16 घरे तयार करण्याचा प्रकल्प आहे.त्यावर महानगर पालिका 434 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.
- डोंगरी परीसरातील जेल रोड,डी प्रभागातील पी.जी.सोलंकी,भायखळा येथील सिध्दार्थ नगर,टॅकपाखाडी या परीसरातील 647 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.
सल्लागार काय काम करणार
- तपशिलवार आराखडा प्रमाणिकरण, पुरावे तपासणे, बांधकाम पर्यवेक्षण, सुरक्षा, गुणवत्तेवर देखरेख, बांधकामाला मंजूरी मिळावी मिळण्यासाठी वास्तुकला सेवा पुरविणे, कामाचा दर्जा राखणे.