मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) शाळांमध्ये रिक्त असणाऱ्या शिक्षकांच्या ८०० जागा तासिका पद्धतीवर भरल्या जाणार आहेत. मुख्याध्यापकांच्या अधिकाराखाली पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीनंतर नियुक्ती दिली जाणार आहे. सोमवारपासून ही प्रक्रिया राबवण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पालिका शिक्षण विभागाचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी दिली.
मुंबई महापालिका शाळांतील गळतीचे प्रमाण कमी झाले असून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे बहुतांशी शाळांत शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे ८०० जागा कंत्राटी (तासिका) पद्धतीवर भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या जागा भरण्याचे अधिकार शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे. त्यामुळे त्या - त्या विभागात शाळांच्या नोटीस बोर्डवर शिक्षकांच्या नियुक्त्यांबाबत आवाहन केले जात आहे. सोमवारपासून याची प्रक्रिया सुरु झाली असून पात्र शिक्षकांना थेट मुलाखतीद्वारे तात्काळ नियुक्ती दिली जाणार आहे. तासिका पद्धतीवर या नियुक्त्या असतील. प्रत्येक तासासाठी १५० रुपये असे दिवसभरात सहा तास शिकवावे लागणार आहे. त्यामुळे दिवसाचे ९०० रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे महिन्यातील २४ किंवा २५ दिवस काम केल्यास २२ ते २३ हजार रुपये शिक्षकांना मानधन दिले जाणार आहे. सहा महिन्यांसाठी ही नियुक्ती असणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार मुदतवाढ दिली जाईल असेही कुंभार यांनी सांगितले. ज्या ठिकाणी एकाहून अधिक अर्ज येतील, त्याठिकाणी डीएड किंवा बीएडच्या गुणांच्या आधारावर ही नियुक्ती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिका शाळांत प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण घेणाऱ्यांची यंदा प्रवेश प्रक्रियेत मुलांची संख्या वाढली आहे. मागील वर्षी २९ हजार मुलांनी प्रवेश घेतला होता. यंदा १ लाख दोन हजार मुलांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे यंदा मुलांचा पट वाढल्याने ८०० शिक्षकांच्या जागा भरल्या जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.