मुंबई (Mumbai) : मुंबईत पावसाचे पाणी तुंबू नये, परिसर पूरमुक्त व्हावा यासाठी बॉक्स ड्रेनचे मजबुतीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे येथील बॉक्स ड्रेनचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे, तर बोरिवली स्थानक परिसरात पावसाचे पाणी तुंबू नये यासाठी नवीन बॉक्स ड्रेनचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले असून 16 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
मुंबईत दरवर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पाऊस बरसतो. या वर्षी 9 जूनला पावसाचे आगमन झाले. पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. पावसाळ्यात मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ नये, रस्ते आणि रेल्वे मार्गावरील वाहतूक बाधित होऊन जनजीवन ठप्प होऊ नये यासाठी महापालिकेकडून 100 टक्के नालेसफाईवर भर दिला जातो. यंदाही महापालिकेने सर्व नाल्यांतील 100 टक्के गाळ उपसा पूर्ण केल्याचा दावा केला आहे. महापालिकेला यावेळी नालेसफाई जमलीच नाही, पण मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे स्थानक परिसरातील गटारे, नाल्यांची साफसफाईही करता आलेली नाही. स्थानक परिसरातील रस्त्यावर तुंबणाऱ्या पाण्याचा वेळीच निचरा व्हावा यासाठी बॉक्स ड्रेनचे काम भरपावसाळ्यात हाती घेण्यात आले आहे.
अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, वांद्रे पूर्व येथील शिवाजीनगर कॉलनी येथे पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी बॉक्स ड्रेनचे काम हाती घेण्यात येणार आहे तसेच बोरिवली स्थानक परिसरात पावसाचे पाणी तुंबू नये यासाठी पाणी वाहून नेण्यासाठी नवीन बॉक्स ड्रेनचे काम करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, मुंबईत पाऊस दाखल झाला असला तरी मुंबई महापालिकेची मान्सूनपूर्व कामे अपूर्णच आहेत. ही कामे झाल्याचा दावा महापालिकेने केला असला तरी नालेसफाई, कचरा, राडारोडा याच्याबाबतच्या तक्रारी सुरूच आहेत.