मुंबई (Mumbai) : मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत शहरातील रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक जंक्शन, उद्यान, समुद्र किनाऱ्यांचे सौंदर्यीकरण केले जात आहे. याअंतर्गत सुमारे 800 कामांसाठी तब्बल 2200 कोटींचा खर्च केला गेला आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, आकर्षक रंगीबेरंगी रोषणाईची कामे करण्यात आली आहेत. यापैकी अनेक ठिकाणची कामे दर्जेदार झाली नसल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या दक्षता विभागाकडून या कामांची तपासणी करण्यात येत आहे.
मुंबई सौंदर्यीकरणाच्या नावाखाली राज्य सरकारच्या दबावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा केल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे 'जी/20'सारख्या परिषदांसाठी दिखावा करण्यासाठी केलेल्या झगमगाटावरून महापालिकेवर चांगलीच टीका झाली. यामध्ये रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या झोपड्या दिसू नयेत यासाठी लावण्यात आलेल्या पडद्यांवरून महापालिकेवर मोठी टीकाही झाली. तर आता पावसाळ्यात या कामांचा दर्जा उघडा पडल्याने दक्षता विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पा अंतर्गत रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक जंक्शन, उद्यान, समुद्र किनाऱयांचे सौंदर्यीकरण केले जात आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, आकर्षक रंगीबेरंगी रोषणाईची कामे करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी झाडांवर केलेली लायटिंग बंद असून वायर धोकादायकरीत्या लटकत आहेत. तर भिंतीवर केलेल्या रंगरंगोटीचा रंग उतरला आहे. या उपक्रमात सुमारे 800 कामांसाठी तब्बल 2200 कोटींचा खर्च केला गेला आहे. इतका खर्च करून अनेक ठिकाणी सौंदर्यीकरणाची दूरवस्था झाल्यामुळे नागरिकांमधून तक्रारी येत आहेत.
सौंदर्यीकरणाच्या कामांचा दर्जा राखला गेला नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आल्यामुळेच दक्षता विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. यात खार, सांताक्रुझ, बोरिवली आणि कांदिवली या ठिकाणी दक्षता विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे तर या पूर्ण पाहणीनंतर महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्यात येईल. या कामांचा दर्जा राखला गेला नसल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई होण्याची शक्यता आहे. मुंबई सुशोभीकरणाच्या नावाखाली पालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या या कामांचे 8 डिसेंबर 2022 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मात्र या वेळी अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नसल्याने पुन्हा तिसऱ्या दिवशी 10 डिसेंबरला याच 500 कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 19 जानेवारी रोजी झालेल्या विकासकामांच्या लोकार्पणावर झालेल्या दहा कोटींच्या कार्यक्रमातही यातील काही कामांचा समावेश पुन्हा एकदा करण्यात आला होता.