मुंबई (Mumbai) : टेंडरसाठी (Tender) तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकापेक्षा 30-35 टक्के कमी दराने अथवा 30-35 टक्के जादा दराने कंत्राटदार (contractor) टेंडर सादर करीत आहेत. यावरुन स्थायी समितीत विरोधकांनी बीएमसी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. प्रशासन मनमानी पद्धतीने निर्णय घेते असा आरोप काँग्रेसने केला, तर लाभार्थींची पोटं भरत नाहीत तोपर्यंत टेंडर अंतिम होत नाही असा आरोप करत या अंदाजपत्रकांचीच आता दक्षता विभागाकडून चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे, बीएमसीच्या या 'अंदाजपंचे' कारभाराची विरोधकांनी अक्षरश: चिरफाड केली आहे.
‘टेंडरनामा’ने वेळोवेळी मुंबई महापालिकेत अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने येणाऱ्या टेंडरचा मुद्दा उपस्थित करुन कामांच्या दर्जावर बोट ठेवले आहे. मलबार हिल येथील ट्रीवॉक बांधण्याचा खर्च महापालिकेच्या अंदाजपत्रकापेक्षा 40 टक्के जास्त आहे. तसेच, महापालिकेच्या अंदाजपत्रकापेक्षा 35 ते 36 टक्के दराने उद्याने, मैदानांचे सुशोभीकरण होणार आहे. त्यावरुन बोलताना महापालिकेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे रवी राजा यांनी, 'गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त दराने होणारे हे काम असल्याचा आक्षेप ट्री वॉकच्या प्रस्तावावर नोंदवला. तर, यापूर्वी 30 टक्क्यांपेक्षा कमी दराने टेंडर आल्यावर त्या रद्द करण्यात आल्या. मग, हे प्रस्ताव कसे आणले जातात असा प्रश्नही रवी राजा यांनी उपस्थित केला.
भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनीही टेंडर दरातील तफावतींवर प्रश्न उपस्थित केले. लाभार्थींची पोटं भरली जात नाहीत तोपर्यंत टेंडर अंतिम होत नाहीत, असा आरोप करत प्रत्येक टेंडरला वेगळे निकष कसे लावले जातात असा प्रश्न उपस्थित केला. अंदाजपत्रकापेक्षा 40 टक्के वाढीव खर्च होणार तर उद्याने, मैदानांची दुरुस्ती 36 टक्के कमी दराने होणार आहे, अशी तफावत कशी असू शकते. अंदाजपत्रक फुगवून तयार केले जाते, असा आरोप करत याची दक्षता विभागाकडून तपासणी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली.
रस्ते दुरुस्तीच्या 443 कोटी रुपयांची कामेही महापालिकेच्या अंदाजपत्रकापेक्षा 15 ते 26 टक्के कमी दराने होणार आहेत, त्यावरुन भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी दर्जाचा प्रश्न उपस्थित केला. कमी खर्चात होणाऱ्या कामाचा दर्जा कसा राखणार या दर्जाची तपासणी कशी होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
फाईल पळवली
आयुक्तांच्या दालनातून अधिकाऱ्याने फाईल पळवली होती, असा आरोपही प्रभाकर शिंदे यांनी केला. लाभार्थींची पोटं भरल्या खेरीज टेंडर अंतिम होत नाही. जर,आयुक्तांनी मंजूरी दिली असती तर आपल्याला लाभ मिळणार नाही त्यामुळे फाईल पळविण्यासारखे प्रकार झाले असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
म्हणून खर्च वाढला
मलबार हिल येथील कमला नेहरु उद्यानाच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या ट्रीक वॉकसाठी महानगरपालिका 17 कोटी 73 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. अंदाजित दरापेक्षा 40 टक्के दराने हा खर्च आहे. त्यावरुन प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी खुलासा केला. हे अंदाजपत्रक 2018 च्या दरानुसार केले होते. आतापर्यंत लोखंडाच्या दरात वाढ झाली आहे. ट्रीवॉकसाठी वापरण्यात येणारे विशिष्ट प्रकारचे लाकूड परदेशातून आणण्यात येणार आहे. तसेच, इतर तांत्रिक कारणामुळे अंदाजपत्रकापेक्षा किंमत वाढल्याचे त्यांनी सांगितले.