मुंबई (Mumbai) : मुंबईतील सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी रस्त्यांचे काम सुरु असतानाचे लाईव्ह प्रक्षेपण महापालिकेच्या रस्ते विभागाकडे करणे बंधनकारक करण्यात येत आहे. त्यामुळे कंत्राटदारांच्या बनवेगिरीला आळा बसणार आहे.
पावसाळापूर्व कामांसाठी मुंबई महापालिका वेगाने कामाला लागली असून, मुंबई शहर आणि उपनगरातील 475 रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. शहर विभागात सर्वाधिक 368 रस्त्यांची कामे सुरू असून मेअखेरपर्यंत सर्व 801 रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे कंत्राटदार आणि मध्यवर्ती यंत्रणेच्या माध्यमातून केली जातात. यामध्ये या वर्षी पावसाळ्याआधी 801 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी रस्त्यांचे काम करतानाचे लाइव्ह प्रक्षेपण रस्ते विभागाकडे करणे बंधनकारक करण्यात येत आहे. यामुळे कंत्राटदार कामाच्या दर्जात बेजबाबदारपणा करीत असल्यास नियंत्रण ठेवणे शक्य होणार असून त्याच्यावर प्रशासनाची जरबही राहणार आहे. शिवाय रस्ते टिकाऊ बनवण्यासाठी सर्वाधिक रस्ते सिमेंट-काँक्रीटचे करण्यावर भर देण्यात येत आहे. महापालिकेच्या अखत्यारीतील दोन हजार किमी रस्त्यांपैकी 1 हजार किमीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. तर या वर्षी आणखी 200 किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मुंबई शहर विभागात एकूण 368 रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये 190 रस्त्यांची कामे सुरू असून 53 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, तर 125 रस्त्यांची कामे सुरू होणे बाकी आहे. पश्चिम उपनगरात या वर्षी 217 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून 156 रस्त्यांची कामे प्रगतिपथावर असून 61 रस्त्यांची कामे सुरू होणे बाकी आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात एकूण 216 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून 129 रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत, तर 82 रस्त्यांचे काम सुरू होणे बाकी आहे.