मुंबई (Mumbai) : मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भांडूप संकुल येथील १९१० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाचे आयुर्मान संपले असून हा जलशुद्धीकरण प्रकल्प नव्याने बांधण्यासाठी मुंबई महापालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी सुमारे ३५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ४,२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र दररोज ३,८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मुंबईला होत असल्याचा दावा महापालिका जल विभागाकडून करण्यात येतो. मात्र दिवसाला २५ ते ३० टक्के म्हणजेच सुमारे ८५० ते ९०० दशलक्ष लिटर पाणी चोरी व गळतीमुळे वाया जाते. त्यामुळे प्रत्यक्षात मुंबईची तहान भागवण्यासाठी फक्त २,९०० दशलक्ष लिटरच पाणी पुरवठा होत असतो. यातील भांडूप संकुलातील जलशुद्दीकरण प्रकल्पात १९१० दशलक्ष लिटर इतक्या पाण्यावर शुध्दीकरणाची प्रक्रिया केली जाते.
भांडूपमधील या जलशुध्दीकरण प्रकल्पाला आता ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पाची संरचना कुमकुवत झाली असून त्याचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करता येथे २००० दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या जलअभियंता अभियांत्रिकी विभागाने घेतला आहे. नव्या प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या जलअभियंता (प्रकल्प) विभागाने दिली आहे. नवीन प्रकल्पाचे काम पूर्ण होईपर्यंत जुना १९१० दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प सुरू राहिल असेही त्यांनी सांगितले. नव्याने बांधण्यात येणाऱ्या भांडूपमधील या जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जलशुध्दीकरण (प्रकल्प) विभागाने दिली आहे.