मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्याऱ्या रुग्णांना आता टेट्रा पॅकचे दूध मिळणार आहे. यासाठी महापालिका सुमारे ४३ कोटी रुपये खर्च करणार आहे. महापालिकेने नुकतेच या कामाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. दूध पुरवठ्यातील सुरक्षिततेच्या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिका रुग्णालयांमध्ये याआधी 'आरे'च्या माध्यमातून दूध पुरवठा केला जात होता. रुग्णालयांच्या गरजेनुसार स्थानिक पातळीवर हे दूध खरेदी करण्यात येत होते. यापुढे केंद्रीय स्तरावर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटदार दररोज महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयाला दूध पुरवठा करणार आहे. याअंतर्गत रुग्णांना एक वेळ दूध देण्यात येते. तसेच लहान मुलांना आणि नवीन मातांना दोन वेळा दूध दिले जाते. सद्यपरिस्थितीत रुग्णांना दूध उकळून पुरवठा करावा लागतो. पण जेव्हा टेट्रा पॅकमध्ये दूध देणे सुरू करण्यात येईल तेव्हा स्वयंपाकघरात दूध उकळण्याची गरज भासणार नाही. तसेच सुरक्षितता वाढणार असून टेट्रा पॅकमधील दूध हे पिण्यासाठी सुरक्षित असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
महापालिका रुग्णालयाच्या प्रत्येक मागणीनुसार 100 मिली, 150 मिली, 200 मिली, 500 मिली आणि 1000 मिलीच्या पॅकमध्ये हा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी महापालिका दरवर्षी विविध आकारांच्या 75 लाख 83 हजार 20 टेट्रा पॅकची मागणी नोंदवणार आहे. प्रत्येक रुग्णाला 100, 150 आणि 200 मिली दूध दिले जाईल. महापालिका रुग्णालयांमध्ये सद्यस्थितीत दुधाची वार्षिक मागणी सुमारे 4.78 कोटी लिटर इतकी आहे.