मुंबई (Mumbai) : भायखळा येथील राणी बागेत येत्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे डोम पद्धतीचे मत्सालय उभारण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) टेंडर प्रक्रिया जाहीर केले आहे. आगामी वर्षभरात ४४ कोटी रुपये खर्च करुन हे म्युझियम बांधण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे.
मुंबईत चर्नीरोड येथील तारापोवाला मत्सालय हे कोरोना काळापासून बंद झाले आहे. त्यामुळे पर्यटकांना या मत्सालयातील विविध प्रजातीच्या माशांना पाहण्याची पर्यटकांची ही संधी कोस्टल रोडच्या कामानेमुळे सध्या बंद आहे. पण नजीकच्या काळात हेच मत्सालय पाहण्याची संधी भायखळा येथील राणी बाग परिसरात मिळणार आहे. येत्या काळात राणी बाग आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘झू पार्क’ होणार आहे. त्यामुळेच पेंग्विनसोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्युझियम पाहण्याची संधी पर्यटकांना येत्या काळात मिळेल.
यंदाच्या वर्षी राणीच्या बागेत एकट्या मे महिन्यात चार लाख पर्यटकांनी भेट दिली. तर या महिन्यात दीड कोटी रूपयांचा महसूल महापालिकेला प्राप्त झाला. राणी बागेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विविध सोयी, सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. कोविडच्या संकटात दोन वर्ष बंद असलेले राणीबाग व प्राणीसंग्रहायल आता पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. राणीबागेत विविध प्राणी, पक्षी आणले जात असल्याने या उद्यानाला एक वेगळेच महत्व आता आले आहे. विविध वृक्षांसोबतच प्राणी आणि पक्षांच्या अधिवासाच्या परिसराचा विकास केला जात असल्याने राणीबागेला एक वेगळाच चेहरा मिळाला आहे.
राणीच्या बागेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘झू पार्क’ बनविण्याच्या प्रक्रियेच्या निमित्तानेच ही पावले आहेत. परिणामी राणी बागेच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. आता पेंग्निवन कक्षातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे डोम पद्धतीचे मत्सालय उभारण्यासाठी पालिकेने टेंडर प्रक्रिया सुरू केलेली आहे. या मत्सालयाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिका ४४ कोटी रुपये खर्च करणार आहे. कंत्राटदाराला हे मत्सालयाचे काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे राणीच्या बागेत पेग्न्विनसोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्सालय पाहण्याची संधीही येत्या वर्षभरात उपलब्ध होईल.
मत्सालयाची वैशिष्ट्ये -
एकूण क्षेत्र ६०० चौरस फूट
देश – विदेशातील लहान – मोठे रंगीबिरंगी मासे
पारदर्शक काचेचे चार टँक
माशांसाठी सिलेंडरसारख्या पारदर्शक काचेच्या हंडी
टनेलच्या पारदर्शक काचेतून मासे पाहण्याची संधी
दोन टनेलची उभारणी