मुंबई (Mumbai) : महापालिका रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासू नये, यासाठी आवश्यक औषधांची खरेदी पालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी ई-टेंडर प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून त्या माध्यमातून ७२ प्रकारची औषधे खरेदी केली जात आहेत. यामुळे पावसाळ्यात औषधांची पूर्तता वेळेवर होईल, असा दावा करण्यात येत आहे. या औषधांच्या खरेदीवर पालिका एकूण ४,०२,६४,४१० कोटी खर्च करत आहे.
पालिकेने दोन प्रकारचे ई-टेंडर मागविले आहेत. पहिले टेंडर २० बाबींसाठी मागवण्यात आले आहे. पालिका रूग्णालये, दवाखाने, प्रसुतिगृहे यामधील रुग्णांच्या वापरासाठी ही औषधे खरेदी केली जात आहेत. यासाठी पालिकेला एकूण ८ डेकर प्राप्त झाले. त्यातील मे. अमर प्रॉडक्ट व मे. पिरमॅक्सो केमिकल यांचे टेंडर प्रतिसादात्मक वाटले. यांचा कालावधी २०२४ पर्यंत असणार आहे. यावर एकूण २,२०,८५,७९४ रुपये खर्च केला जात आहे.
पालिकेच्या लॅबोरेटरी केमिकल्स, स्टेटन्ससाठी लागणाऱ्या आवश्यक औषधांसाठी देखील पालिकेने ई-टेंडर मागविले आहेत. या टेंडरच्या माध्यमातून ५२ प्रकारच्या बाबींची पूर्तता केली जाणार आहे. पालिकेची सर्व रुग्णालये,प्रसूतिगृह, दवाखाने यांतील लॅबोरेटरी केमिकल्स, स्टेटन्स रीजेंट सोल्युशन यांचा यामध्ये समावेश आहे. यावर एकूण १,८१,७८,६१६ रुपये खर्च केला जात आहे. यासाठी पालिकेला एकूण १८ देकार प्राप्त झाले. त्यातील १४ प्रतिसादात्मक तर ४ अप्रतिसादात्मक टेंडर ठरले. यातील ५२ पैकी २५ बाबींचे वाटप सुरू करण्यात आले असून बाकी औषधांची पूर्तता ३० दिवसांच्या आत करायचा आहे.