मुंबई (Mumbai) : मुंबईतील रस्त्यांवर जोरदार पावसामुळे होणारे खड्डे भरून काढण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने जिओपॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आगामी सुमारे १५ महिने कालावधीकरिता खड्डे भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने टेंडर जाहीर केले आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे हे तिन्ही विभाग मिळून सुमारे ५ कोटींची पाच टेंडर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पंधरा महिने ठेकेदाराचा दोष दायित्व कालावधी राहणार आहे. त्याचप्रमाणे काम पूर्ण झाल्यावर ५० टक्के आणि दोष दायित्व कालावधी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के रक्कम कंत्राटदारास दिली जाणार आहे.
मुंबई शहरात खड्डे भरण्यासाठी अपयशी ठरलेल्या कोल्ड मिक्सच्या तंत्रज्ञानाला पर्यायी अशा तंत्रज्ञानाची चाचपणी मुंबई महानगरपालिकेने गेल्या आठवड्यापासून सुरू केली होती. पावसाळ्यात दिवसागणिक खड्डे वाढल्यानेच अखेर मुंबई महानगरपालिकेने या नव्या तंत्रज्ञानाचा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत २६ जुलैपर्यंत १८ हजार ६४८ खड्डे पडल्याची संपूर्ण शहरातील आकडेवारी आहे. रस्ते विभागाने पूर्व मुक्त मार्गाच्या खाली दयाशंकर चौक, मुंबई पोर्ट ट्रस्टचा रस्ता तसेच आणिक-वडाळा मार्गावर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके सादर केली होती. यामध्ये रॅपिड हार्डिंग काँक्रिट, एम ६० काँक्रिट भरून त्यावर स्टील प्लेट अंथरणे, जिओ पॉलिमर काँक्रिट आणि पेव्हर ब्लॉक या चार पद्धतींचे प्रायोगिक तत्त्वावर सादरीकरण करण्यात आले होते. या चारही पद्धतींच्या प्रात्यक्षिकानंतरच आता दोन तंत्रज्ञानाच्या वापरावर महापालिकेने शिक्कामोर्तब केले आहे.
नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या रस्ते विभागाची आढावा बैठक देखील घेण्यात आली होती. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबईत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची तसेच नवीन तंत्रज्ञानाची चाचपणी केल्याविषयी देखील मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर भरून, वाहतूक सुरळीत राहण्यासाठी कायमस्वरूपी चांगला पर्याय अंमलात आणावा, असे निर्देश त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
या पार्श्वभूमीवर, प्रायोगिक चाचणीमध्ये निदर्शनास आलेल्या निष्कर्षानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रॅपिड हार्डनिंग काँक्रीट आणि जिओ पॉलिमर या दोन नवीन व अभिनव पद्धतींचा उपयोग करून रस्त्यांवरील खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे हे तिन्ही विभाग मिळून सुमारे ५ कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या एकूण पाच टेंडर जाहीर करण्यात आले आहेत. कार्यादेश दिल्यापासून पुढील पंधरा महिने कालावधीसाठी या टेंडरद्वारे कंत्राटदार नियुक्त केले जातील. खड्डे भरण्याचा पंधरा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर त्यापुढील पंधरा महिने दोष दायित्व कालावधी (DLP) लागू राहणार आहे. विशेष म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर ५० टक्के तर दोष दायित्व कालावधी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के रक्कम कंत्राटदारास दिली जाईल. तशी तरतूद या टेंडरमध्ये करण्यात आली आहे. सध्या प्रचलित पद्धतीमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर ८० टक्के तर दोष दायित्व कालावधीत २० टक्के रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाते.