मुंबई (Mumbai) : मुंबईच्या पूर्व उपनगरातील देवनार, गोवंडी, मानखुर्द या भागातील जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती थांबविण्यासाठी, दुषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी व जलवाहिन्यांशी संबंधित इतर कामे करण्यासाठी मुंबई महापालिका १४ कोटी खर्च करणार आहे. महापालिकेने पुढील दोन वर्षांसाठी या टेंडरचा कालावधी निश्चित केला आहे.
पाणीपुरवठ्यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर ही कामे तातडीने करावी लागतात. ही कामे वेळेत न केल्यास पाण्याचा अपव्यय होतो, तसेच पाण्याचे दुषितीकरण होते. ही कामे केल्यानंतरच त्याबाबतचे अंदाजपत्रक तयार करण्यात येते. काम करण्यापूर्वी त्याची प्रशासकीय मंजुरी घेणे शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या कंत्राटातील रकमेच्या आधारे महानगरपालिकेने कार्यालयीन अंदाजपत्रक तयार केले होते. जलवाहिन्यांच्या जाळ्यामधून पाण्याची गळती थांबवणे, पाण्याचे दूषितीकरण दूर करणे, अपुऱ्या पाणीपुरवठ्यासंबंधी उपाययोजना करणे, आवश्यकता असल्यास नवीन जलवाहिनी टाकणे, जुन्या तसेच गंजलेल्या जलवाहिन्या बदलणे, सिमेंट काँक्रिट व पर्जन्य जलवाहिन्यांच्या कामामध्ये आड येणाऱ्या जलवाहिन्यांचे स्थलांतरण करणे, जलजोडण्याचे नूतनीकरण करणे आदी विविध कामे तातडीने हाती घेण्याची वेळ अनेकदा येते.
या कामांसाठी दिलेल्या टेंडरची मुदत ऑगस्ट महिन्यात संपुष्टात आली आहे. त्यामुळे नवीन कंत्राटदाराच्या नियुक्तीसाठी महानगरपालिकेने टेंडर मागवले होते. टेंडर प्रक्रियेअंती या कामांसाठी एका कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. कंत्राटदाराने अंदाजित खर्चापेक्षा २६ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे. कंत्राटदाराकडे स्वतःचे सर्व साहित्य आहे, खोदकामासाठी लागणारी यंत्रसामुग्री आहे. त्यामुळे त्याने कमी दर भरल्याचा खुलासा केला आहे. तसेच साडेचार कोटी रुपये सुरक्षा अनामत म्हणून ठेवली आहे.