मुंबई (Mumbai) : मुंबईमधील सात परिमंडळांतील लहान व मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी महापालिकेने कंत्राटदार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सात परिमंडळातील मोठ्या नाल्यांमधील व शहर भागातील छोट्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी महापालिका ७८ कोटी रुपये खर्च करणार आहे. तर पश्चिम उपनगरांतील लहान नाले, पेटिका नाल्यांच्या सफाईसाठी ५२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा नालेसफाईवर एकूण १३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
स्थायी समितीच्या आज होणाऱ्या शेवटच्या बैठकीत याबाबतचे प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आले आहेत. मुंबईतील नालेसफाई वर्षभर तीन टप्प्यात होत असून पावसाळापूर्व नालेसफाई एप्रिलपासून सुरू होते. वर्षभराचे नियोजन करण्यासाठी डिसेंबरपासूनच नालेसफाईची टेंडर मागवली जातात.
गेल्या दोन वर्षांपासून १०० टक्क्यांच्या पुढे गाळ काढल्याचा दावा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला होता. तरीही मुंबईत पाणी तुंबल्यामुळे नालेसफाई झालीच नसल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. त्यामुळे यंदाही नालेसफाईवर महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करणार आहे. त्याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत मांडण्यात आले आहेत. सात परिमंडळातील मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी पालिका एकूण ७८ कोटी खर्च करणार आहे. छोट्या नाल्यांमधील व मिठी नदीतील गाळ काढण्यासाठीचा खर्च यापेक्षा वेगळा असणार आहे. नालेसफाईच्या कामांपैकी ७० टक्के कामे ही पावसाळ्यापूर्वी केली जातात. तर १५ टक्के पावसाळ्यादरम्यान, तर १५ टक्के पावसाळ्यानंतर करण्यात येतात. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होते.
नालेसफाईच्या साधारण ४८ कामांसाठी दरवर्षी टेंडर मागवावी लागतात. मुंबईतील मोठे नाले, छोटे नाले तसेच मिठी नदी यांची एकूण लांबी ही सुमारे ६८९ किमी एवढी आहे. पश्चिम उपनगरातील छोटे नाले, पेटीका नाले, तसेच रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या आणि पातमुखे यामधील गाळ काढण्यासाठी महापालिकेने कंत्राटदारांची निवड केली असून त्याकरिता ५२ कोटी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे नालेसफाईचा एकूण खर्च १३० कोटींवर जाणार आहे.