मुंबई (Mumbai) : दहिसर पश्चिमेकडील रमाकांत तरे मार्ग येथे 'सीबीएसई' शाळा सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणची धोकादायक इमारत पाडून अद्ययावत सुविधा असलेली सात मजली इमारत बांधली जाणार आहे. नव्या इमारतीसाठी सुमारे 17 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून महापालिकेच्या साडेतीन लाखांवर विद्यार्थ्यांना गणवेशापासून बूट, छत्री, बेस्ट बस पास अशा तब्बल 27 प्रकारच्या वस्तू मोफत दिल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी 'सीबीएसई' बोर्डाच्या शाळाही सुरू करण्यात येत आहेत. दहिसर पश्चिमेला सखाराम तरे मार्ग येथे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेची दोन मजली सी आकाराची इमारत होती. यापैकी बी बिल्डिंगचा पुनर्विकास करण्यात आला आहे, येथे सहा मजली इमारत उभारण्यात आली असून 2023 मध्ये येथे 'एसएससी' बोर्डाची शाळा सुरू करण्यात आली आहे. आता ए बिल्डिंग पाडून त्या ठिकाणी सात मजली इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी 17 कोटी 8 लाख 66 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी टेंडर प्रक्रियाही राबवण्यात आली आहे. ही इमारत दोन वर्षांत पूर्ण करून तेथे 'सीबीएसई' शाळा सुरू करण्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रयत्न आहेत.
या शाळेचे क्षेत्रफळ 4916.76 चौ.मी. इतके आहे. इमारतीच्या तळमजल्यावर प्रवेश लॉबी, बहुउद्देशीय सभागृह, वाचनालय, पहिल्या मजल्यावर चार वर्गखोल्या, मुलांकरिता व मुलींकरिता शौचालय, मुख्याध्यापकांकरिता खोली, स्टोअर रूम. दुसऱ्या मजल्यावर सहा वर्गखोल्या, एक संगणक खोली व शौचालय, कर्मचारी खोली, तिसऱ्या मजल्यावर सहा वर्गखोल्या बांधण्यात येतील. शिवाय एक कर्मचारी खोली व शौचालय, चौथ्या मजल्यावर सहा वर्गखोल्या, विज्ञान प्रयोगशाळा व शौचालय पाचव्या मजल्यावर सहा वर्गखोल्या, शौचालय, कर्मचारी खोली व एक संगीतकला खोली. सहाव्या मजल्यावर सहा वर्गखोल्या, शौचालय व सातव्या मजल्यावर सहा वर्गखोल्या, व्हर्च्युअल वर्गखोली, कर्मचाऱ्यांकरिता खोली व शौचालय राहणार आहे.