मुंबई (Mumbai) : 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या जोरावर हिंदुस्थान आज जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. लोकशाहीची ही मशाल कायम तेवत रहावी, लोकशाहीचे वातावरण लोकांना अनुभवता यावे यासाठी फोर्ट परिसरात मुंबई महापालिकेडून लोकशाही चौक उभारण्यात येणार आहे. महापालिकेच्या नियोजन विभागाने त्यासाठी ४ कोटी २५ लाखांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2021-22 अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून क्रॉस मैदानाजवळील वाहतूक जंक्शन येथे लोकशाही चौक उभारण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारकडून पाच कोटींच्या निधीची शिफारस करण्यात आली आहे. लोकशाही चौकात कोणताही पुतळा उभारण्यात येणार नाही, तर स्वयंचलित कलाकृती उभारली जाणार असून एक विशेष बाब म्हणून याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कलाकृती आणि पोडियम हे समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या लोकशाहीच्या खांबांचे प्रतीक असतील. लोकशाहीचे प्रतीक असलेली कलाकृती अँथोनी होवे हा कलाकार उभारणार आहे. लोकांना इथे येऊन मोकळेपणाने वावरता, बोलता येणार आहे. मुंबई महापालिकेने यासाठी 4 कोटी 25 लाख 68 हजार 400 कोटींचे ई-टेंडर प्रसिद्ध केले आहे, तर सुरक्षा अमानत रक्कम 4 लाख 25 हजार 700 रुपये आहे. महापालिकेकडे टेंडर पाठवण्याची अंतिम तारीख 16 जून आहे. डिसेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
मुंबईतील आर्थिक, व्यावसायिक परिसर म्हणून फोर्ट परिसर ओळखला जातो. मात्र रात्रीच्या वेळी हा सर्व परिसर निर्जन होतो, याची रया जाते. उभ्या राहणार्या या लोकशाही चौकामुळे फोर्टमधील या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून हा परिसर अधिक खुलून दिसणार आहे.