मुंबई (Mumbai) : मुंबईत रुग्णांच्या सुविधेसाठी येत्या काळात आणखी रुग्णालयांची भर पडणार आहे. मुंबई उपनगरात आणखी रुग्णालये वाढवण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे नव्याने 2 हजार बेड्स वाढणार आहेत. सध्या तीन हॉस्पिटलसाठी टेंडर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरात रुग्णालये वाढवण्याचे उद्धिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पूर्व उपगनरामध्ये मुलुंड (अग्रवाल हॉस्पिटल), गोवंडी, भांडूप याठिकाणी रुग्णालयांची भर पडणार आहे. तर पश्चिम उपनगरामध्ये दहिसर, वांद्रे भाभा हॉस्पिटल, कांदिवली याठिकाणी ही रुग्णालयांची भर पडणार आहे. तर नायर येथेही सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलची भर पडणार आहे. या सगळ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुमारे 2 हजार बेड्सची अतिरिक्त संख्या मुंबईत उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत ज्या भागात हॉस्पिटलची सुविधा नव्हती किंवा क्षमतावाढ गरजेची होती अशा ठिकाणी हॉस्पिटलच्या संख्येत तसेच बेड्सच्या संख्येत भर घालण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
या हॉस्पिटलच्या संख्या वाढीसाठी तीन हॉस्पिटलसाठी टेंडर प्रक्रिया सुरसुरु करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांनी दिली. त्यामुळेच येत्या काळात या रुग्णालयांमध्ये उपनगरातील नागरिकांनाही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले. मुंबईत अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.