मुंबई (Mumbai) : चर्नी रोड स्थानकाजवळून गिरगाव साहित्य संघापर्यंत जाणारा चार वर्षांपूर्वी तोडण्यात आलेला पादचारी पूल मुंबई महापालिका नव्याने बांधणार आहे. या पुलासाठी महापालिका 5 कोटी 57 लाखांचा खर्च करणार आहे. महापालिकेने या पादचारी पुलाचे बांधकाम करण्यासाठी टेंडर मागवले आहे.
चर्नी रोड स्थानकाजवळून गिरगावमध्ये जाण्यासाठी हा महत्त्वाचा पूल होता. मात्र सुमारे 100 वर्षे जुना असणारा हा पूल धोकादायक झाल्याने तोडण्यात आला होता. हा पूल अद्याप बांधला नसल्याने गिरगावमध्ये ये-जा करण्यासाठी वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे वेळ वाया जात होता. शिवाय अपघाताचीही भीती होती. या पार्श्वभूमीवर रहिवासी-प्रवाशांकडूनही हा पूल बांधण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने या पादचारी पुलाचे बांधकाम करण्यासाठी टेंडर मागवली आहेत. वर्षभरात या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे गिरगावकरांचा वळसा वाचणार असून वाहतूककोंडीतून सुटकाही होणार आहे.
अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील 'हिमालय' पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे महापालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने, तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. नव्या पुलांमुळे प्रवास सुखकर-सुरक्षित होणार आहे.