मुंबई (Mumbai) : हिंदमाता (Hindmata), परळ (Parel) येथील पूरमुक्तीसाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) टेंडर (Tender) न मागवता विविध टप्प्यात कामे केली आहेत. तब्बल 31 कोटी रुपयांचा खर्च महानगर पालिकेने टेंडर न मागवता केला असून तब्बल आठ महिन्यांनंतर ही माहिती स्थायी समितीच्या पटलावर सादर करण्यात आली आहे.
परळ, हिंदमाता परिसरातील पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगर पालिकेने भूमिगत टाक्या बांधल्या आहेत. गेल्या वर्षी युध्द पातळीवर हे काम सुरु करण्यासाठी महानगर पालिकेने टेंडर न मागवताच कामे करुन घेतली आहेत. वडाळा येथे नाल्याच्या भिंतीची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करणाऱ्या कंत्राटदाराला परस्पर हे काम सोपविण्यात आले. मूळ कंत्राट 43 कोटी 86 लाख रुपयांचे असून हिंदमाता परळ परिसरात करण्यात आलेल्या कामामुळे त्यात 31 कोटी 99 लाख रुपयांची वाढ झाली आहे. हे काम आता 75 कोटी 86 लाख रुपयांवर पोहोचले आहे. प्रशासनाने या वाढीव कामाला मार्च 2021 मध्ये मंजूरी दिली होती. मात्र, आता हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर माहितीसाठी मांडला आहे. शुक्रवारी (ता.3) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली.
ही सर्व कामे सुरु असतानाच भाजपने यावर आरोप केले होते. या प्रकल्पातील 150 कोटी रुपयांची कामे विना टेंडर देण्यात आली असल्याचा आरोप भाजपने केला होता. आता टप्प्या टप्प्याने या कामाची माहिती सादर केली जात आहे.
31 कोटीत ही कामे झाली
हिंदमाता उड्डाण पुलाच्या खाली 16 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद आणि 4.5 मीटर खोल अशा दोन टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर सेंट झेव्हीअर्स मैदानात 1 कोटी लिटर क्षमतेची साठवण टाकी बांधणे, या टाकीत पंपाव्दारे पावसाचे पाणी वाहून आणण्यासाठी खाशाबा जाधव मार्ग आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड जंक्शन येथे उदंचन केंद्र बांधणे, 900 मीटरची वाहिनी बांधणे त्याबरोबर टाकीत साठवलेले पाणी पर्जन्यवाहिनीत आणण्यासाठी 750 मी.मी व्यासाची वाहिनी बांधणे अशी कामे करण्यात आली आहे.
मायक्रोटनलिंगही टेंडर न मागवता
याच प्रकल्पाचा भाग असलेल्या हिंदमाता येथील टाकीतील पाणी दादर पूर्वेकडील प्रमोद महाजन कला उद्यानात वाहून आणण्यासाठी मायक्रोटनलिंग करुन वाहिन्या बांधण्यात आल्या. यासाठी पालिकेने 26 कोटी 82 लाख रुपयांचा खर्च केला. मात्र, या कामासाठीही पालिकेने टेंडर मागवल्या नव्हत्या. हे काम लालबाग परिसरात मायक्रोटनलिंगेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला विना टेंडर देण्यात आले आहे.